महापालिकेने 77 मिळकतींना ठोकले टाळे

पिंपरी – वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करुन आणि विविध उपाययोजना राबवूनही मिळकत कराची थकबाकी वसूल होत नसल्याने अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या भात्यातून कारवाईचे अस्त्र बाहेर काढले आहे. पालिकेने थकबाकी असलेल्या 77 मिळकतींना टाळे ठोकण्याची कारवाई केली आहे. तसेच सव्वा लाख मिळकतधारकांना नोटीस बजावल्या आहेत.

आर्थिक वर्ष संपत आले असले तरी थकबाकी संपत नसल्यामुळे पालिका आता कारवाईचा बडगा उगारणार हे निश्‍चित आहे. सोमवार अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत थकबाकीचे 47 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. अजूनही 11 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोतांपैकी एक असलेला मिळकत कर पूर्णपणे वसूल व्हावा, यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतधारकांना कर भरता यावा यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी, बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सर्वाधिक थकबाकीदार थेरगावात
थेरगावात सर्वांत जास्त थकबाकीदार आहेत. यामुळे कारवाईचा आकडा ही थेरगावात आल्यावर मोठा होतो. पालिकेने कारवाई केलेल्या 77 मिळकतींपैकी 24 मिळकती थेरगावातील आहेत. त्याखालोखाल आकुर्डी परिसरातील 14, चिंचवड 12, तळवडे 9, सांगवी 9, मोशी 5, पिंपरीनगर 3, निगडी, प्राधिकरण 1 अशा एकूण 77 थकबाकीदार असलेल्या मिळकतींना टाळे ठोकले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)