महापालिकेने नेमलेले खासगी सल्लागार रद्द करा

पिंपरी – महापालिकेने नेमलेले सर्व सल्लागार रद्द करावेत, असे फर्मान भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी काढले आहे. त्यामुळे भाजपच्या वर्षभराच्या कार्यकाळात नेमण्यात आलेले सल्लागार रद्द होणार का तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध विकास कामे केली जातात. काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाते. यासाठी पालिकेचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. प्रत्येक गोष्टीसाठी खासगी सल्लागाराची नियुक्ती करून कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. हा खर्च वाचवण्यासाठी महापालिकेने नेमलेले सर्व सल्लागार रद्द करण्यात यावेत. मागील 10 वर्षामध्ये सल्लागारांसाठी झालेल्या खर्चाची सर्व अर्थिक तपशील द्यावेत. यामुळे महापालिका प्रशासनामध्ये सुसूत्रता येईल.

महापालिकेतील अभियंते, अधिकारी यांनी पालिकेच्या विनाकारण खर्चामध्ये वाढ करू नये. मागील दहा वर्षामध्ये सल्लागारावर महापालिकेचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. सल्लागार रद्द केल्यानंतर खर्चाची बचत होवू शकते. महापालिका वास्तुविशारदांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च करते. त्यामुळे खासगी वास्तुविशारद न नेमता महापालिकेने पगारी पध्दतीने वास्तुविशारद नेमावेत. वास्तुविशारदासाठी महापलिकेने स्वतंत्र वास्तुविशारद कला कक्ष तयार करावा, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

ते निर्णय रद्द होणार का?
महापालिकेत प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपकडून पहिल्या वर्षी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक सिमा सावळे यांच्याकडे स्थायी समितीची सूत्रे होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामांसाठी सल्लागार नेमण्याचे निर्णय घेण्यात आले. आता लक्ष्मण जगताप यांनीच फर्मान काढल्याने मागील वर्षभराच्या कार्यकाळातील सल्लागारांना घरचा रस्ता दाखवला जाणार का, याबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)