महापालिकेने दिलेल्या घरांची होणार तपासणी

सदनिकांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या
पुणे, दि. 27 – महापालिकेकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच रस्ता बाधितांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सदनिकांची तपासणी करण्यात येणार आहे. अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतरही ही घरे वापरत आहेत. तसेच काहींनी ती भाडेकराराने दिलेली आहेत. तर पालिकेने रस्ता बाधितांना दिलेली घरेही अशा प्रकारे भाडेकराने देऊन त्यातून उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात येत असल्याने पालिकेच्या झोपडपटटी निर्मूलन आणि पुनर्वसन (झोनिपू ) विभागाकडून अत्ता पर्यंत देण्यात आलेल्या सर्व सदनिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे आदेश सर्व पेठनिरिक्षकांना देण्यात आले असून त्यांना महापालिकेने वाटप केलेल्या सदनिकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधलेल्या आहेत. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही घरे नाममात्र भाडयाने पालिकेकडून दिली जातात. नियमानुसार, महापालिकेतून सेवा निवृत झाल्यानंतर संबधित कर्मचाऱ्यांनी ही घरे सोडणे आवश्‍यक आहे.मात्र, अनेक कर्मचारी हे घर सोडत नाहीत. तसेच आपला वारस महापालिकेत नोकरी मिळवत असल्याचे कारण पुढे करीत घर सोडत नाहीत. तर काही जण सेवेत असतानाच; दुसरीकडे स्वत:चे घर घेतल्यानंतर आपले नातेवाईक पालिकेच्या घरांमध्ये राहत असल्याचे सांगत घर भाडेकराने देऊन उत्पन्न मिळवितात. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना घर मिळत नाही. त्यामुळे या सर्व घरांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार असल्याचे झोनिपू विभागाचे उपायुक्त संतोष भोर यांनी सांगितले.
———
रस्ता बाधितांकडूनही फसवणूक
शहरातील रस्ता रूंदीकरणामध्ये घरे गेलेल्या नागरिकांनाही पालिकेकडून तापुत्या स्वरूपात घरे दिली जातात. महापालिकेच्या जागा विकसित करून देणाऱ्यांकडून पालिकेस आर 7 अंतर्गत बांधलेली घरे ताब्यात मिळतात. ही घरे या बाधितांना दिली जातात. कालांतराने या बाधितांचे पुनर्वसन पालिकेकडून एसआरए योजना अथवा बीएसयुपी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये केले जाते. मात्र, हे रस्ता बाधितही आपल्याला मिळालेली घरे भाडे कराराने देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना पालिकेने या पूर्वी घरे दिली आहेत. त्यांच्या माहितीची नोंद प्रशासनाकडे असून त्यानुसार, प्रत्येक घरामध्ये जाऊन घर दिलेला नागरिकच राहतो का याची खातरजमा केली जाणार आहे.
——————————–

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)