महापालिकेत 2,763 पदांच्या भरतीची “दिवाळी’

तुषार रंधवे

पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार अद्यापही नोकर भरती झालेली नाही. प्रत्येक विभागात मनुष्यवळाचा तुटवडा जाणवत असून, विविध विभागांकडून होणाऱ्या मागणीनुसार कर्मचारी पुरविताना प्रशासन विभागाची दमछाक होत आहे. ही बाब लक्षात घेत, महापालिका प्रशासनाने विविध 311 संवर्गातील एकूण 2, 763 पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला “ग्रीन सिग्नल’ मिळताच ही पदे भरली जाणार आहेत.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या 22 लाखांपेक्षा अधिक असून, महापालिकेचे क्षेत्रफळ 181 चौरस किलोमीटर एवढे आहे. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा “ब’ वर्ग महापालिकेत समावेश झाला आहे. यापूर्वीच्या “ब’ वर्गाच्या पुणे महापालिकेच्या धर्तीवर या महापालिकेचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने नोकर भरतीला मनाई केल्याने अनेक वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही.

महापालिका आस्थापनेवर “अ’ ते “ड’च्या संवर्गात 311 मंजूर असून, त्याअंतर्गत एकूण 9763 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 7000 पदे भरलेली असून 2,763 पदे रिक्त आहेत. याशिवाय महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व राजीनामा अशा विविध कारणांमुळे दरवर्षी पद रिक्त होण्याचे सरासरी प्रमाण 300 ते 325 एवढे आहे. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांची संख्या सहावरून आठ करण्यात आली असून, या कार्यालयांकरिता नव्याने कर्मचारी भरती न करता, उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच त्यांचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महापालिकेचा 23 टक्के खर्च होत आहे. नव्याने केल्या जाणाऱ्या नोकर भरतीमुळे हे प्रमाण 34 टक्‍क्‍यांवर पोचणार आहे. आस्थापना खर्च एखून खर्चाच्या 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असता कामा नये, असे निर्देश असल्याने, नव्याने होणाऱ्या नोकर भरतीचा आर्थिक ताण महापालिकेवर पडणार नाही. याशिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असन, अशिया खंडातील सर्वात “श्रीमंत’ महापालिका असा महापालिकेचा नावलौकिक आहे. त्यामुळे नव्या पदभरतीमुळे वाढणाऱ्या खर्चाचा अतिरिक्त ताण महापालिकेवर पडणार नसल्याची स्थिती आहे.

नोकर भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे महापालिका आस्थापनेवरील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या थांबविण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिका अस्थापनेत वर्ग तीन व चार संवर्गातील पदांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, महापालिकेच्या नोकर भरतीला मंजुरी देण्याची मागणी या प्रस्तावात केली आहे.

महापालिका आस्थापनेवरील पदांचा आढावा घेतला असता, एकूण 2,763 पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर, महत्त्वाच्या विभागांच्या प्राधान्यक्रमानुसार ही पद भरती केली जाणार आहे.
– मंगेश चितळे,
सहाय्यक आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)