महापालिकेत सल्लागारांना “अच्छे दिन’

पिंपरी – महापालिकेच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी सल्लागारांवर लाखोंची उधळपट्टी करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कित्ता भाजपकडूनही गिरविला जात आहे. उलट, भाजपने त्यावर कडी करत फर्निचर खरेदीपासून ते मैदानात पॉलिग्रास टाकण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. विविध नऊ कामांसाठी सल्लागार नेमण्याच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 23) झालेल्या सभेत बिनबोभाट मंजुरी देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळातही महापालिकेच्या अनेक प्रकल्पांसाठी सल्लागार नेमले जात होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपने सल्लागारांवरील उधळपट्टी कमी करण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. साधनसुचितेचा आव आणणाऱ्या भाजपच्या काळात “फुटकळ’ कामांसाठीही सल्लागार नेमण्याचा सपाटा सुरु आहे. आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावाचा अक्षरशः पाऊस पडला. आयत्यावेळी सल्लागार नेमणुकीचे तब्बल नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएमएच) फर्निचर खरेदीसाठी दोन कोटी, वाकड येथील उद्यान विकास, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्रांती चौक ते शनिमंदिरपर्यंत रस्ता विकसित करणे, नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये पॉलिग्रास टाकणे, दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेचे नुतनीकरण, सांगवीतील रस्त्याचे नुतनीकरण तसेच ब प्रभागातील विविध विकास कामांसाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने विनाचर्चा हिरवा कंदील दाखविला. तसेच वाकड येथे उद्यान विकसित करण्यासाठी वास्तू विशारद नेमण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या आधीही महापालिकेने अनेक सल्लागार नेमले आहेत. मात्र त्यानंतरही या विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या त्रुटी निघाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. तर अनेक प्रकल्प न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये अडकले आहेत. महापालिकेत प्रथम सत्तेवर आलेल्या भाजपकडून सल्लागारांवरील उधळपट्टीला चाप लागेल, अशी शहरवासियांचा आशा होती. मात्र, ती पूर्णतः फोल ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळातील ठेकेदारांना घरी बसवून आपल्या मर्जीतले ठेकेदार नेमण्याचा पायंडा सत्ताधारी पाडत आहेत. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत विषय पत्रिकेवरील 29 कोटी 54 लाख 47 हजार रुपये खर्चाचे एकूण 60 तर ऐनवेळच्या 5 कोटी 35 लाख 81 हजार रुपये खर्चाच्या 18 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

विषय पत्रिकेवरुन नगरसेवकांची नाराजी
नगरसेवकांकडून आपआपल्या प्रभागातील कामांना विषय समित्यांची मंजुरी मिळविण्यासाठी आयुक्तांकडे मागणी पत्र दिले जाते. मात्र, त्यानंतही विषयपत्रिकेवर हे विषय तब्बल 90 दिवस उशिरा येत आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत देखील विषयपत्रिकेवरील प्रस्तावित कामे 81 ते 90 दिवस विलंबाने घेण्यात आले. नियमानुसार ते 30 दिवसांच्या आता येणे अपेक्षीत आहे. याबाबत स्थायी समिती सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्‍त केली. नगरसेवक विलास मडिगेरी व राजू मिसाळ यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे खुलासा मागितला. अधिकारी संथगतीने काम करत असून त्याचा फटका नगरसेवकांना बसत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)