महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांची “सेटिंग’

सभागृहात “मिलीभगत’ : … अन्‌ पत्रकांद्वारे “पोपटपंची’

– अधिक दिवे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी – सत्ताधाऱ्यांविरोधात माध्यमांसमोर पत्रकबाजी आणि आरोपांची खैरात करणारे विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक स्थायी अथवा सर्वसाधारण सभेच्या सभागृहात “चिडीचूप’ राहतात. प्रशासकीय चौकटीत विरोध नोंदवून विकास कामांना मंजुरी दिली जाते आहे. मात्र, प्रभावी विरोध करुन चुकीचा निर्णय रद्द करण्याची क्षमता विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि सर्वपक्षीय विरोधकांची “मिलीभगत’ आहे का? असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे.
—-
पंतप्रधान आवास योजनेतील बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्प राबवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “दर’भिन्नता होती. त्यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. प्रकल्पाचा ठेका असलेल्या संस्थेत भाजप नेत्यांची कथित भागीदारी, टक्‍केवारी, पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाचा संबंध आदी आरोपांनी रान उठले होते. तत्पूर्वी, “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. शहराच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वपूर्ण असले, तरी त्याला राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेसह अन्य विरोधकांनी कायम विरोध केला. मात्र, तरीही असे अनेक प्रकल्प सत्ताधारी भाजपने मंजूर केले.

विशेष म्हणजे, निविदा प्रक्रियेचा कालावधी आणि दर आकारणी पद्धती (डी.एस.आर. आणि एस.एस.आर.) याबाबत भाजपच्याच सदस्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती. तत्कालीन स्थायी समितीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. मात्र, आज त्याच दर प्रणालीनुसार मंजुरी दिली जात आहे.

वास्तविक, सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवून एखादा चुकीचा निर्णय होण्यापासून रोखण्याची भूमिका विरोधकांना बजावायची असते. त्यासाठी कोणत्याही विषयाला विरोध करताना त्याचा तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या अभ्यास करणे अपेक्षीत आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असतानाही लोकशाही मार्गाने सभागृहात अचूक विरोध केल्यास चुकीच्या कामांना प्रतिबंध करता येईल. मात्र, गेल्या दीड वर्षात असा अपवाद वगळता एकही विषय नाही. ज्यासाठी सत्ताधारी भाजपवर निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

परंतु, सल्लागार पद्धती, आवास योजना, “वेस्ट टू एनर्जी’ यासह अनेक विषयांना भाजपने मंजुरी दिली. विरोधक मात्र पत्रकबाजी आणि माध्यमांसमोर आरोप-प्रत्यारोप करीत राहिले. विरोधी पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहाबाहेर एखाद्या विकास कामाला तीव्र विरोध करतात. आंदोलनाचा इशारा देतात. मात्र, त्याच पक्षाचे नगरसेवक सभागृहात पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत नाहीत. याउलट, “आमचा विरोध नोंदवून विषय मंजूर करा’, अशी सोयीस्कर भूमिका घेतली जाते.

बोऱ्हाडेवाडी येथील आवास प्रकल्पावरुन तेच चित्र पहायला मिळाले. या प्रकल्पासाठी निविदेतील दरांवरुन विरोधकांनी रान उठवले. मात्र, स्थायी समिती सभागृहात राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. तरीही हा प्रकल्प चर्चेविना मंजूर करण्यात आला. फ्लेक्‍सबाबतच्या धोरणाचीही तिच परिस्थिती होती.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी या प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच, अशाप्रकारे बांधकाम करण्यासाठी प्रतिचौरस फूट 1500 ते 1700 रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही, असा दावा केला होता. महापालिका प्रशासनाने कारपेट एरियाचा हाच दर 3 हजार 96 रुपये इतका ठेवला आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी प्रकल्पाच्या निविदेची चौकशी करावी, अशी आग्रही मागणी केली असतानाही स्थायी समितीत सेनेच्या दोन्ही सदस्यांनी विरोध केला नाही. राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनीही चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मग, पक्षाची भूमिका आणि महापालिकेतील विविध समितींमधील सदस्यांची भूमिका यात कायम विरोधाभास दिसतो. यावर पक्षश्रेष्ठी काहीच बोलत नाहीत, ही आश्‍चर्याची बाब आहे.

विरोधकांचा पाठपुरावा कमी पडतोय
एखाद्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करायचा आणि सभागृहात काहीच बोलायचे नाही, हा विरोधाभास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षाच्या सदस्यांनी केवळ पत्रकबाजी न करता सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा यांसह विविध समित्यांच्या सभांमध्ये चुकीच्या कामांना अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे. कोणत्याही समितीचा सदस्य हा त्या-त्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत असतो. त्यासाठीच प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार समिती सदस्यांची निवड होत असते. त्यांनी पक्षाची बाजू मांडणे अपेक्षीत असते. एखाद्या विषयाला विरोध करायचा असे पक्षाचे धोरण ठरले असेल, तर त्याप्रमाणे समिती अथवा सर्वसाधारण सभेत पाठपुरावा केला पाहिजे, अशी अपेक्षा करदात्या नागरिकांची आहे. वास्तविक, सध्यस्थितीला सत्ताधारी भाजपकडे बहुमत असले तरी, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण विरोध करुन भाजपला जेरीस आणणे सहज सोपे आहे.

वाहवा मिळवण्यासाठीच विरोध?
महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेसह सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकही अनेकदा पदाधिकाऱ्यांविरोधात पत्रकबाजी करताना दिसतात. त्यावेळी चुकीच्या निर्णयांना खतपाणी घालणार नाही असा सूर प्रत्येकाचा दिसतो. पण, पुढे काय होते? गेल्या दीड वर्षांच्या काळात सत्ताधारी आपल्या पद्धतीने विषय मंजूर करीत आहेत. विरोधकांची भूमिका सभागृहात मवाळ होते. एखाद्या विषयावर “राडा’ करुन आवश्‍यक त्या विषयाला सोईस्कर बगल दिली जाते. आज एखाद्या विषयाला केलेला विरोध उद्या मावळतो. पुन्हा नवीन विषयाला हात घातला जातो. पूर्वीच्या विषयाचे काय झाले? याबाबत कोणालाही सोयरेसुतक नाही. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे विरोध केवळ स्वत:च्या फायद्यासाठी केला जात असावा अथवा विरोध करताना अभ्यास न केल्यामुळे स्वत:चा “पोपट’ होत असेल. तसेच, माध्यम अथवा शहरातील नागरिकांची वाहवा मिळवण्यासाठी किंवा स्वत:चे उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी विरोध केला जातो काय, अशी उलट-सुलट चर्चा शहरवासियांमध्ये आहे.

प्रकल्पाच्या दर्जाबाबत तडजोड का?
कोणत्याही प्रकल्पाचा दर्जा आणि गुणवत्ता यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाने तीनदा निविदा दर कमी केले. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: याबाबत ठेकेदाराशी “बार्गेनिंग’ केले. त्याच प्रकल्पाबाबत पुन्हा प्रशासनाने दर कमी करुन म्हणजे सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची बचत केल्याचा दावा केला आहे. त्याला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील स्थायी समिती सदस्यांनी चर्चेविना मंजुरी दिली. वास्तविक, प्रशासनाने प्रकल्पाच्या दर्जामध्ये तडजोड केली आहे, असे दिसते. महापालिका जिप्सम प्लास्टर ऐवजी वॉलकेअर पुट्टीचा वापर करणार आहे, अशी चर्चा आहे. त्यात अन्य काही बाबींचा समावेश असेल. पण, एखादा प्रकल्प राबवत असताना त्याच्या दर्जाबाबत तडजोड का करावी? असा प्रश्‍न आहे. वास्तविक, निविदेत एखाद्या गोष्टीचा समावेश करुन दर ठरवले असतील आणि त्यात बदल केले जात असतील, तर निविदा नव्याने राबवली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी का केली नाही, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)