महापालिकेत कनिष्ठ व उप अभियंत्यांच्या घाऊक बदल्या

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील बदलीस पात्र ठरलेल्या कनिष्ठ व उपअभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी कनिष्ठ अभियंता संवर्गातील 37 तर उप अभियंता संवर्गातील 10 अशा एकूण 47 अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करत असताना अनेक अभियंत्यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या विभागात बदली मिळाली आहे. तर अनेकांनी “मलाईदार’ विभागांत पोस्टिंग करुन घेण्यात यश मिळवले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मागविलेल्या बदलीच्या परिपत्रकानंतर वर्ग एक ते चार मधील एकूण 120 कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रशासन विभागाला प्राप्त झाले होते. 31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर प्रशासन विभागाच्या वतीने बदलीस पात्र ठरणाऱ्या अभियत्यांची यादी तयार करण्यात आली.

कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये सर्वाधिक बदल्या पाणीपुरवठा विभागातून अन्य विभागांमध्ये करण्यात आल्या आहेत. तर उपअभियंता संवर्गातील 10 पैकी पाणीपुरवठा व बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील प्रत्येकी तीन उप अभियंत्यांचा समावेश आहे. कनिष्ठ अभियंता संवर्गातील 37 अभियंत्यांपैकी 16 अभियंते हे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. अनधिकृत नळजोडप्रकरणी पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या कठोर कारवाईच्या भूमिकेनंतर या विभागातील 16 कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास या विभागाचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन, प्रशासन विभागाच्या वतीने कनिष्ठ संवर्गातील अभियंत्यांची बदली करताना हे निकष पाळले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

…तर शिस्तभंगाची कारवाई
बदली झालेल्या या सर्व अभियंत्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला अथवा बदली रद्द करण्यास राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व अभियंत्यांचे गोपनीय अहवाल प्रशासन विभागाला सादर करून, फेब्रुवारी 2019 चे वेतन बदलीच्या विभागातून काढण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या शिवाय या अभियंत्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन जुन्याच विभागातून अदा केल्यास, विभाग प्रमुखास जबाबदार धरले जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)