महापालिकेतील 37 कर्मचाऱ्यांना दणका?

टंकलेखनाची प्रमाणपत्रे बोगस : तंत्रशिक्षण मंडळाचा महापालिकेला अहवाल

पिंपरी –पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या 116 कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेताना शासकीय टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे प्रशासनाकडे सादर केली होती. या प्रमाणपत्रांबाबत पालिका प्रशासनाने राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे पडताळणी केली असता, त्यातील 79 जणांची प्रमाणपत्रे खरी आणि योग्य असल्याचा निर्वाळा तंत्रशिक्षण मंडळाने दिला आहे. उर्वरित 12 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांबाबत अद्याप पालिका प्रशासनाला मंडळाने काहीही कळविलेले नाही. तसेच, 25 जणांची प्रमाणपत्रांबाबत नोंद आढळत नाही, असा अहवाल तंत्रशिक्षण मंडळाने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे या 37 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पदोन्नती मिळाल्यानंतर विहित मुदतीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या 11 कर्मचाऱ्यांना आयुक्त हर्डीकर यांनी यापूर्वीच पदावनत केले आहे. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत काही कर्मचारी अद्यापही आपल्या पूर्वीच्याच ठिकाणी काम करीत आहेत. त्यांना आपापल्या विभागप्रमुखांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशालाच त्यांना दुय्यम असलेल्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्‍ती दिल्यानंतर दोन वर्षांच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्‍यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नसल्याने 11 लिपिकांना मजूर व्हावे लागले आहे. त्यांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणत गट “ड’ मधील मजूर पदावर नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांतील लिपिक पदावर कार्यरत असलेल्या अकरा लिपिकांची नियुक्ती अनुकंपावर करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला होता. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे 11 लिपिकांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखांना खुलासा केला होता. मात्र ते खुलासे समाधानकारक वाटले नाहीत. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी या अकरा जणांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली असून त्यांची गट “ड’ मधील मजूर पदावर रवानगी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्‍ती दिल्यानंतर दोन वर्षांच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्‍यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशा 11 लिपिकांना मजूर पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली असून, गट “ड’ मधील पदांवर रवानगी केली आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)