महापालिकेच्या सभेत जिल्हाधिकारी द्विवेदी झाले टार्गेट

विषयपत्रिकेवरील विषयासाठी आता सोमवारी पुन्हा सभा

नगर – गुरुवारी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यामुळे तहकुब करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण आज चांगलीच वादळी ठरली. स्वेच्छानिधीतील कामांची बिले काढण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी चांगलेच आक्रमक झाले होते.त्यांनी थेट जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनाच “टार्गेट’ केले. नगरसेवकांनी आक्रमक होत दोन कामांचे धनादेश मिळविण्यासाठी सभागृहामध्ये ठिय्या दिला. या ठिय्यापुढे नमलेल्या प्रशासनाला अखेर सभागृहातच धनादेश देणे भाग पडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वेच्छा निधीबरोबरच इतर कामांवरुन त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी द्विवेदी यांना लक्ष्य करून त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावर आक्षेप घेत ते काम बंद करण्याची मागणी केली. गुरुवारी छिंदम प्रकरणामुळे सभा तहकूब करण्यात आली होती. ती आज दुपारी 1 वाजता महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सुरु करण्यात आली. विषयपत्रिकेवरील विषय बाजूला ठेवून तब्बल पाच तास अवांतर विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहिल्याने अखेर विषयपत्रिकेवरील विषयासाठी पुन्हा आजची सभा तहकुब करण्यात आली. आता ती सोमवारी होणार आहे. सर्वसाधारण सभेतील विषयऐवजी स्थायी समितीच्या विषय आजच्या सभेत उकरून काढण्यात आला.स्थायी समितीच्या सभेतील विषयपत्रिकेवर नसलेले हितसंबंधी विषय इतिवृत्तात मंजूर दाखवण्यासाठी “तसेच’ च्या नावाखाली घुसडवले जातात, असाच प्रकार महासभेच्या इतिवृत्ताबद्दलही होत असल्याचे उघड झाले.

याच चर्चेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी स्टेशन रस्त्यावरील सीना नदीच्या पुलाला 1 कोटी 50 लाख रुपये इतिवृत्त मंजूर नसताना कसे उपलब्ध केले, याला हरकत घेतली. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिफारस केलेली 31 कामे रद्द करण्याची मागणी बोराटे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली.नगरसेवकांना दादागिरीची भाषा वापरली गेल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकमेकांवर जोरदार आरोपप्रत्यारोप केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीच्या विषयावर केवळ चर्चा होते. मात्र हे विषय विविध परवानग्या व प्रशासकीय मान्यतेतच अडकले आहेत. प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही होत नाही, याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली.

निवडणूक तोंडावर आली असताना प्रभागातील विकास कामे विशेषत: स्वेच्छानिधीतील कामे मार्गी लागत नसल्याचा नगरसेवकांचा असंतोष सभेत उसळला. खुल्या गटात करण्याची मागणी असताना बंद गटारीची कामे होत असल्याबद्दलही नगरसेवकांमध्ये नाराजी होती. इतर बिले निघतात मात्र पुतळा उभारणीच्या कामात हलगर्जीपणा केला जात असल्याकडे अभय आगरकर यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. त्याला सचिन जाधव यांनी मंगलगेट भागात अर्धवट काम झालेल्या समाजमंदिराची जोड देत राजीनाम्याची भाषा वापरत सभागृहात ठिय्या दिला व समाजमंदिर तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे धनादेश लगेच देण्याची मागणी केली.सर्वपक्षीयांच्या आक्रमकतेपुढे प्रशासनाला ती मान्य करावी लागली

स्वेच्छानिधीतील 263 कामांपैकी 102 कामांचे 70 लाख दिले गेले आहेत. या निधीतील बिले काढण्याचे काम सुरु आहे. याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मानकर यांनी समर्थन केले. मात्र नगरसेवक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आयुक्‍तांना लक्ष्य करीत त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम कोणत्या निधीतून, निविदा काढली का, याची विचारणा करत हे काम थांबवण्याची मागणी केली. अधिकारी आयुक्‍तांचे नाव सांगत स्वत:च्या मनमानी करत असल्याचा आरोपही करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)