महापालिकेच्या संकेतस्थळावर उपमहापौर मोरे “हाईड’

प्रशासनाची नजरचूक? : अधिकाऱ्यांनी हात झटकले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ आता नव्या “लूक’ तयार केले आहे. मात्र, नवीन संकेतस्थळावर सत्ताधारी भाजपच्या उपमहापौर शैलेजा मोरे यांचे नाव दिसत नाही. वास्तविक, महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती आणि अध्यक्षांची माहिती देण्यात आली आहे. पण, उपमहापौरांच्या नावाचा उल्लेख करण्याबाबत नजरचूक झाली झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने आधुनिक व नावीण्यपूर्ण नव्या “लूक’मध्ये संकेतस्थळ निर्माण केले आहे. नव्याने विकसित झालेली संगणक यंत्रणा, टॅब्लेट आणि मोबाईल वेब ब्राऊजरसाठी संकेतस्थळ पूर्णतः सुसंगत बनविले आहे. नुकतेच महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पालिका भवनात उद्‌घाटनही करण्यात आले. या संकेतस्थळाला दरमहा अंदाजे एक ते दीड लाख नागरिक भेट देत आहेत. संकेतस्थळात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्याने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्‍यक बदलही केले आहेत. त्याचे नेटिझन्समधून स्वागतही करण्यात आले आहे.

मात्र, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवीन संकेतस्थळ बनविताना उपमहापौर शैलेजा मोरे यांच्या नावाचा कुठेही समावेश केलेला नाही. त्यांना महापालिका संकेतस्थळावरुन वगळले आहे. याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. तसेच, महापालिका प्रशासनाने सहा ऐवजी आठ प्रभाग कार्यालये बनविली आहेत. यातील ह आणि ग प्रभाग कार्यालयाचे उद्‌घाटन दि. 9 ऑगस्टला क्रांतीदिनी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्या ह आणि ग प्रभाग कार्यालयाचा महापालिकेच्या कार्यपत्रिका व सभावृत्तांत विभागात समावेश केलेला नाही. सध्या त्यात पूर्वीचे प्रभाग झोन समित्यांचीच नावे दिसत आहेत. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान विभागाने संकेतस्थळ नव्या “लूक’मध्ये बनविताना काही अपडेट करण्याचे नजरचुकीने राहीले आहे, असे चित्र दिसत आहे.

महापालिका संकेतस्थळावरुन उपमहापौराचे नाव आम्ही वगळलेले नाही. याबाबत मला काहीच माहिती नाही, याविषयी अधिक माहिती घेवून सांगतो, असे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)