महापालिकेच्या रुग्णालयात पोलिओ लसींचा खडखडाट…!

सरकारी आरोग्य यंत्रणा निष्क्रीय असल्याचे उघड : एकेका लसींसाठी पालकांची भटकंती सुरुच..

आशिष रामटेके

पुणे – इंजेक्‍शनद्वारे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसींचा शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लसींची अत्यावश्‍यक गरज असतानाही पुरेसा साठा उपलब्ध करण्यास सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याने त्यांची निष्क्रियता उघड होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकेका लसीसाठी पालकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र सध्या पुण्यात दिसत असून इंजेक्‍टेबल पोलिओ लसींचा खडखडाटामुळे सध्या तोंडावाटे पोलिओ डोस देण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पोलिओचा डोस इंजेक्‍शनद्वारे देण्याचा आग्रह धरला, त्याला केंद्र सरकारने प्रतिसाद देत एप्रिलपासून सरकारी लसीकरणामध्येही इंजेक्‍टेबल पोलिओ लस सुरू केली. त्याच वेळी जगभरातून इंजेक्‍शनद्वारे देण्यात येणाऱ्या लसींची मागणी वेगाने वाढली. ही लस उत्पादित करणाऱ्या जगभरात मोजक्‍याच कंपन्या आहेत. तेथील लसींचे उत्पादन आणि वाढलेली मागणी याचे प्रमाण व्यस्त झाल्याने देशात इंजेक्‍टेबल पोलिओ लसींचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे.

याबाबत भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, जगभरातून पोलिओच्या लसींची मागणी वाढल्याने पुरवठा विस्कळित झाला आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या देशात जाणवत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्वचेतून (इंट्रा डर्मल) पोलिओचे इंजेक्‍शन देण्याची तडजोड स्वीकारण्यात आली आहे. हा डोस दिल्यानंतरही चार ते सहा आठवड्यांमध्ये इंजेक्‍टेबल पोलिओ द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बालकांना ही लस मिळेल. पुण्यातील बहुतांश बालरोगतज्ज्ञ आता लहान मुलांना तोंडातून पोलिओचा डोस देत आहेत. इंजेक्‍टेबल पोलिओसाठी वणवण फिरूनही ती मिळत नसल्याचे शहरातील बालरोगतज्ज्ञांचे मत आहे.

आरोग्य यंत्रणा सक्रीय असणे गरजेचे…

महापालिकेच्या एका शासकीय रुग्णालयात दोन वर्षाच्या बाळाला इंजेक्‍टेबल पोलिओ लसीकरण करण्यासाठी आलेले हडपसर येथील गजानन सुर्यवंशी (पालक) म्हणाले, गेल्या आठवडयाभरापासून मी व माझी पत्नी बाळाला घेऊन इंजेक्‍टेबल पोलिओ लस घेण्यासाठी रुग्णालयात येत आहे. मात्र, येथे ही लस उपलब्ध नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या लसीमुळे बाळाला विषाणूपासून पूर्णत: संरक्षण मिळत असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ही लस गरजेची असून शासनाने ती तत्काळ उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी आरोग्य यंत्रणा नेहमी सक्रीय असणे गरजेचे आहे.

इंजेक्‍टेबल पोलिओची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. शिवाय, इतर लसींप्रमाणे पोलिओची लस “दर करार’ पद्धतीने मिळत नसल्याने पोलिओचे डोस तोंडावाटे दिले जात आहेत. डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त संचालिका (राज्य आरोग्य खाते)

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये इंजेक्‍शनद्वारे देण्यात येणारी पोलिओची लस उपलब्ध नाही. गेल्या महिन्याभरापासून ही लस मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. साठा उपलब्ध असेपर्यंत बालकांना ही लस देण्यात आली. मात्र, आता तोंडावाटे पोलिओ डोस दिला जात आहे. डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य अधिकारी (मनपा)

पोलिओचे “पी 1′, “पी 2′ आणि “पी 3′ हे तीन विषाणू आहेत. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमधून फक्त “पी 1′ आणि “पी 3′ या विषाणूंपासून संरक्षण मिळते. “पी 2′ पासून संरक्षण मिळत नसल्याने इंजेक्‍टेबल पोलिओची लस उपलब्ध करून दिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)