महापालिकेच्या मिळकतीचे नुकसान केल्यास कारवाई

एसआरए योजनेसाठी नवीन अट घालणार – आयुक्त
प्रभात वृतसेवा
पुणे, दि. 28 – शहरात झोपडपटटी पुर्नवसन योजने अंतर्गत काम करणाऱ्या विकसकाने संबधित जागेतील महापालिकेचे कोणतेही बांधकाम काढण्यापूर्वी त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेकडून घेणे बंधनकारक करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यसभेत दिले. तसेच हे काम विकसकास देताना ही नवीन अट त्यांच्या करारानाम्यात समाविष्ट केली जाणार असून या अटीचे पालन झाले नसल्यास त्यांना मोबदला म्हणून दिला जाणारा टीडीआर थांबवून त्यांच्याकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसआरए योजनेच्या माध्यमातून आंबील ओढा मध्ये झोपडपटटी पुर्नवसन योजना राबविली जात आहे. या ठिकाणी दोन विकसकांची कामे सुरू असून हे काम पूर्ण होण्या आधीच एका विकसकाने या भागात नागरिकांसाठी असलेले स्वच्छतागृह जमीनदोस्त केल्याने या भागातील नागरिकांची अडचण निर्माण झाली असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी केली. यावेळी ही बाब गंभीर असून प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली. यावेळी या प्रकरणी तातडीने प्रत्यक्ष जागा पाहणी करून विकसकावर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्त कुमार यांनी मुख्यसभेत दिले. तसेच महापालिकेच्या मिळकतीचे नुकसान करण्याचा अधिकार कोणासही देण्यात आलेला नसल्याचे सांगत एसआरए योजनेत भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी विकसकास काम देतानाच, त्या जागेत महापालिकेची मिळकत असल्यास ती काढण्यासाठी पालिकेचा अभिप्राय घेणे बंधनकारक केले जाईल. तसेच या अभिप्रायानुसार, काम झाले का नाही याची खातरजमा संबधित विकसकास टीडीआर देताना केली जाईल असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)