महापालिकेच्या दारातच अवैध वाहनतळ

पिंपरी – पिंपरी महापालिका मुख्यालयाकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अहल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झाला असून तिथेही अवैध रिक्षा उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतुकीस खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्‍यता असल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.

महापालिकेला स्वतंत्र पार्किंगची सोय असूनही अनेक वाहने महापालिकेच्या जवळून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी करण्यात येत आहे. रस्ता अरूंद असूनही गांधीनगरपर्यंत वाहने उभी करण्यात येत आहेत. दुसऱ्या वाहनांची रस्त्यावरून ये-जा असल्याने नागरिकांना रस्त्यातून वाट काढणे कठीण झाले आहे. परिसरात महापालिकेसोबतच अनेक बॅंका, आणि इतर कार्यालय असल्याने नागरिकांची गर्दी असते. त्यात जागोजागी वाहने पार्क केलेली असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते आहे. एवढा सगळा प्रकार पालिकेच्या समोरच होतोय तरी पालिका प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस देखील तेवढ्या पुरतीच कारवाई करतात. मात्र, ते निघून गेले की परिस्थिती “जैसे थे’ होते. या अवैध पार्किंगमुळे एखाद्याचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अहल्यादेवी होळकर चौकापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने या चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता अरूंद झाला आहे. यामुळे वाहनांच्या सकाळ-संध्याकाळ महापालिकेपुढे रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. अशा वेळी देखील वाहतूक सुरळीत असून कुठे ही अडथळा होत नाही आहे. मात्र, अहल्यादेवी चौकातच अवैध रिक्षा उभ्या राहत असल्याने सिग्नल सुटल्यानंतर मागून वेगाने येणाऱ्या गाड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष घालून चौकात अवैध रिक्षा उभ्या दिसल्यास कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अवैधपणे उभ्या असलेल्या रिक्षावर रोज कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांचे फोटो पाठवावेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु असतो. नागरिकांनीही वाहतुकीची नियम पाळून पोलिसांना सहकार्य करायला हवे.
– संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग.

मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. त्यात अहल्यादेवी होळकर चौकात अवैधपणे रिक्षा उभ्या राहतात. त्यात सिग्नल सुटल्यानंतर मागून येणाऱ्या गाड्या वेगात असतात. रस्ता अरूंद असून रिक्षा चौकात उभ्या राहत असल्याने अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे.
– राजेंद्र शिंदे, नागरिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)