महापालिकेच्या अंदाजपत्रकार मुख्यसभेची मोहोर

तब्बल 23 तास चर्चा ः 5 हजार 912 कोटींच्या विकासकामांना एकमताने मान्यता

पुणे – अंदाजपत्रकात असमान तरतूदी केल्याचा आरोप करीत विरोधकांचा राजकीय टिकेचा भडीमार आणि सत्ताधाऱ्यांनी परखडपणे मांडलेली बाजू यामुळे तब्बल तीन दिवसांमध्ये 23 तासांची प्रदीर्घ चर्चा झाली. या अंदाजपत्रकावर 80 नगरसेवकांच्या भाषणांनतर स्थायी समितीने मांडलेल्या महापालिकेच्या 5 हजार 912 कोटींच्या अंदाजपत्रकाला मुख्यसभेने शनिवारी रात्री कोणताही बदल न करता मान्यता दिली.
यावेळी अंदाजपत्रक तयार करताना कोणताही आकस मनात न ठेवता तो शहराचा विचार करून मांडला आहे. शहराचा संतुलित आणि दिर्घकालीन विकास करण्यासाठी विरोधक आणि महापालिका प्रशासनाला सोबत घेऊनच याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्‍वासन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहास दिले.
तसेच महापालिकेच्या सभागृहाची स्वतंत्र गरीमा असून अंदाजपत्रकात असमान तरतूदी झाल्याचे कारण पुढे करीत अंदाजपत्रका विरोधात करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात यावी, अशी विनंती मोहोळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना केली. तसेच अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राजकीय जोडे सभागृहाबाहेर ठेऊन शहराचा विकास करण्याचे आश्‍वासन देणारे विरोधक आता प्रत्येक सभा, चर्चेला राजकारण करतात. त्यांनी आपला शब्द पाळल्यास शहराचा विकास झपाट्याने होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे भावनिक आवाहन मोहोळ यांनी वेळी सभागृहात केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)