महापालिकेचे “स्टेअरिंग’ कधी सांभाळणार?

पिंपरी-चिंचवड वर्तमान
निशा पिसे
—-
“श्रीमंत’ महापालिकेचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठी भाजपकडून राहुल जाधव यांना संधी देण्यात आली आहे. रिक्षा चालक ते महापौरपदापर्यंत झेप घेतलेल्या जाधव यांनी नुकतीच रिक्षा चालवत माजी महापौरांचे सारथ्य केले. तर पीएमपीची ई-बस चालवत जोरदार “फोटोसेशन’ केले. भाजपच्या धोरणानुसार जाधव यांना सव्वा वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यापैकी तीन महिन्यांचा कालावधी त्यांनी पुर्ण केला आहे. मात्र, महापालिका कारभारात त्यांचा “नवनिर्वाचितपणा’ अद्याप कायम आहे. शहरावर पाणी कपातीचे संकट आहे. कचऱ्याचा प्रश्‍न जटील होत चालला आहे. महापालिका प्रशासकीय कारभारात कोणाचा कोणाला पायपोस राहिलेला नाही. सत्ताधारी नगरसेवकच विविध प्रश्‍नांवरुन “घरचा आहेर’ देत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कारभाराचे “स्टेअरिंग’ महापौर कधी सांभाळणार, असा प्रश्‍न सामान्यांमधून उपस्थित होत आहे.
—-
महापालिकेत प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपचे दुसरे महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला. मात्र, त्यासाठी स्थायी समिती सदस्यपदाच्या राजीनाम्यापासून ते “कुणबी-मूळ ओबीसी वादा’पर्यंत अनेक “कुरापती’ करण्यात आल्या. महापौरपदाच्या निवडीपासून राहुल जाधव वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करताना त्यांच्या समर्थकांनी हजारो किलो भंडारा उधळला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भंडाऱ्याचा चिखल होवून अनेकजण जखमी झाले. त्यामुळे महापालिकेची सुत्रे स्विकारताच शहरवासियांची माफी मागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. हे प्रकरण शांत होत नाही तोच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाया पडल्यामुळे त्यांनी नवीन वाद ओढावून घेतला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राहुल जाधव हे मनसेचे नगरसेवक होते. त्यामुळे त्यांचे राज ठाकरे यांच्याशी असलेले ऋणानुबंध कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र, शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या जाहिरपणे लीन होणे कितपत योग्य आहे, असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित झाला.

भाजपच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी राहुल जाधव यांना मिळाला आहे. महापौरपदी विराजमान होवून जाधव यांना तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही महापालिकेच्या कारभारात त्यांना जम बसविता आला नाही. महापौरांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित असते. मात्र, शहर अभियंत्यांवरील कारवाई, शिक्षण प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव यातून राहुल जाधव यांचे प्रशासनाशी अद्याप सूर जुळले नसल्याचे स्पष्ट झाले. नगरसेवक, पत्रकारांवरील “दिवाळी गिफ्ट’ची लयलुट चांगलीच चर्चिली गेली. कासारवाडीतील एका हॉटेलमध्ये गेलेल्या महापौरांनी तत्काळ भोजन देण्याचे फर्मान सोडले. मात्र, बुकींग खेरीज जेवण दिले जात नसल्याचा नियम संबंधित हॉटेल चालकाने महापौरांना दाखविला. त्यावर संतापलेल्या महापौरांनी या हॉटेलवर कारवाईचे आदेश दिले. मात्र, प्रसिद्धी माध्यमांपर्यंत ही खबर पोहचल्याचे लक्षात येताच, विद्युतवेगाने त्यांनी कारवाईचे आदेश मागे घेतले. महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नुकताच बर्सिलोना दौरा केला. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी तेथे पोहचून महापौरांनी परदेशात भटकंतीची हौस पुर्ण केली. यावरील चर्चा थंड होत नाही तोच महापौरांनी रिक्षा चालवत माजी महापौरांचे सारथ्य केले. पीएमपीएमएलची स्वतः इलेक्‍ट्रीक बस चालवत चाचणी घेतली. प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. परवाना नसताना त्यांनी वाहन चालविल्याचे समोर आले.

शहरावर सध्या पाणी कपातीचे संकट घोंघावत आहे. शहर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जलपर्णी काढण्यासाठी सामाजिक संस्था नदीपात्रात उतरल्या आहेत. पुरेशा सोयी सुविधांअभावी औद्योगिक परिसराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. समाविष्ट गावांसाठी अर्थसंकल्पात यावेळी भरीव तरतूद करण्यात आली. परंतु, तेथील विकास कामांना म्हणावी तशी गती मिळाली नाही. अनेक महत्त्वाच्या निविदा प्रक्रियेत विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक प्रभागांमधील नगरसेवकांमध्ये वर्चस्ववाद उफाळून आला आहे. महापालिका प्रशासनातही छुपा सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार दिशाहिन झाला आहे. अशा परिस्थितीत महापौरांकडून अनेक अपेक्षा शहरवासियांना आहेत. विनम्र स्वभावशैलीमुळे सर्वपक्षीयांशी राहुल जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचा उपयोग त्यांनी महापालिकेची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी करण्याची अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त होत आहे. राहुल जाधव हे पिंपरी-चिंचवडचे 25 वे महापौर आहेत. महापौर हे केवळ शोभेचे पद नसल्याचे यापूर्वीच्या मोजक्‍याच महापौरांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे परवाना नसताना वाहन चालवून महापौर पदाची “शोभा’ करायची की महापालिकेचे यशस्वीपणे सारथ्य करायचे याचा विचार करुन राहुल जाधव यांना पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)