महापालिकेची हॉटेल व्यावसायिकांवर वक्रदृष्टी

पिंपरी – खाद्य पदार्थ विक्री करून दिवसाला लाखो रुपयांचा गल्ला जमा करणाऱ्या अलिशान हॉटेलच्या मालकांनी महापालिकेचा मिळकत कर भरण्यास मात्र हात आखडता घेतला आहे. तब्बल 16 कोटी 16 लाख एवढी कराची रक्कम वसुलपात्र असल्याने एकूण 221 हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. 31 मार्चपूर्वी मिळकत कर जमा करण्याचे सक्त आदेश हॉटेल व्यावसायिकांना पालिकेने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींचा मिळकत कर वसूल करण्यासाठी कर संकलन विभागाने नेमलेल्या पथकांकडून ठोस कारवाई होत नसल्याने वसुलपात्र कराचा अकडा फुगला आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडे सर्वात अधिक मिळकत कराची रक्कम वसुलपात्र आहे. 2017-18 मध्ये 3 कोटी 97 लाख 53 हजार 648 एवढा मिळकत कर वसूल झाला. तर, एकूण करापैकी 16 कोटी 16 लाख 44 हजार 569 एवढा मिळकत कर हॉटेल व्यवसायिकांनी थकविला आहे. मिळकत कर थकविणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने कर संकलन विभागामार्फत विभागनिहाय स्वतंत्र पथके नेमली आहेत. पथकांमार्फत वसुलीचे कामकाज सुरू आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांकडून त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आहे. त्यामुळे शहरातील 221 हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना 31 मार्चपर्यंत मिळकत कर भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर मिळकत कर थकविणाऱ्या व्यावसायिकाला एकूण करावर दोन टक्के मनपा शास्ती लागू केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

हॉटेल व्यावसायिक दिवसाला दहा ते वीस लाखांहून अधिक गल्ला करतात. अशा हॉटेल मालकांनी मिळकत कर थकविला आहे. तर, त्यातील काही हॉटेल व्यावसायिकांनी मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात एक रुपयाही कर पालिकेला भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या थकित करात भर पडत गेली आहे. हा कर वसूल करण्यासाठी कर संकलन विभागाने बॅंड पथके तयार केली होती. मात्र, पथके सुस्तावल्याने त्याचा कर वसुलीवर परिणाम पडला आहे. चालू वर्षात 389.80 कोटींचा कर वसूल झाला आहे. 2017 मध्ये 122.69 कोटी एवढी थकबाकी आहे. तर, 267.11 कोटींची चालू वर्षात मागणी आहे. हा कर वसूल करण्यासाठी बॅंड पथकांमार्फत कार्यवाही होण्याची गरज आहे. मात्र, 31 मार्चपर्यंत मुदत पालिकेला प्रतिक्षा आहे.

बेकायदेशीर हॉटेल्स्‌कडे दुर्लक्ष
शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे हॉटेल व्यावसायांत वाढ झाली आहे. बहुतांश हॉटेल्स हे उंच इमारतींच्या वारच्या मजल्यावर सुरू आहेत. त्यासाठी बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेचा परवाना देखील घेतलेला नाही. आग सदृश्‍य घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशा हॉटेल व्यावसायिकांकडे अपेक्षित उपकरणे नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. विनापरवाना सुरू असलेल्या अशा हॉटेल व्यावसायिकांनी देखील मिळकत कर भरणा करण्यास चालढकल केली केली. नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास ग्राहक बनून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्‍यात घालावा लागणार आहे. अशा हॉटेल व्यावसायिकांकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)