भवानीनगर गोदामात तयारी पूर्ण; मोठा पोलीस बंदोबस्त
नगर: कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून शहरापासून लांब असलेल्या ठिकाणी होणाऱ्या महापालिका निवडणुकीची मतमोजणी यावेळी शहरातच होणार आहे. त्या दृष्टीने जागा निश्चित करण्यात आली आहे. नागरी वस्ती असलेल्या भवानीनगर परिसरात वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. शहरातच मतमोजणी झाल्यास पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.10) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी विविध जागांची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध नसल्याने अखेर आनंदऋषीजी मार्गावर असणाऱ्या भवानीनगर परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
निवडणूक अवघ्या पाच – सहा दिवसांवर येवून ठेपल्याने प्रशासनाने मतदानासह मतमोजणीची तयारीही सुरू केली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच गोडाऊनमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थित पार पडावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था व नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान!
मागील वर्षभरातील गंभीर घटनांमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे. मात्र, मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी असल्याने व तीही शहरात नागरी वस्ती असलेल्या भागात होणार असल्याने पोलिसांसमोर नियोजनाचे मोठे आव्हान आहे. मतमोजणीवेळी गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त ठेवतानाच भवानीनगर परिसरातील नागरिकांना व तेथील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या बंदोबस्ताचा त्रास होणार नाही, याची खबरदारीही पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा