महापालिकेचा सांडपाणी पुनर्वापर आराखडा तयार

पिंपरी – पिंपरी – चिंचवड सह हिंजवडी, चाकण आणि तळेगाव – दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार, कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने किंवा पीपीपी माध्यमातून उभारण्याच्या प्रस्तावावर महासभेने नुकतेच शिक्कामोर्तब केले. प्रकल्प उभारण्यासाठी शहर परिसराची पिंपळे – सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड – एमआयडीसी, चिखली, निगडी, प्राधिकरण, तळेगाव – एमआयडीसी आणि चाकण-एमआयडीसी अशी चार भागात विभागणी केली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. महापालिकेने प्रायोगिक तत्वावर एका प्रभागात 2016 साली सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शाश्वत जलस्त्रोतनिर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन आणि नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात आता राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुनर्चक्रिकरण व पुनर्वापरासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यासाठी आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रीयायुक्त पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र, एमआयडीसी, रेल्वे किंवा अन्य मोठ्या प्रमाणावरील खरेदीदार यांना प्रक्रीयायुक्त पाणी पुरविण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लॉंड्री दुकाने, कुलिंग टॉवर, हौसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणीही वापरण्यात येणार आहे.

पिण्याव्यतिरीक्त वापरासाठी प्रक्रियायुक्‍त पाणी
महापालिका हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या 30 ते 50 टक्‍क्‍यापर्यंत पाणी वापर हा सांडपाण्यावर प्रक्रीया केलेल्या पाण्याने पुर्नचक्रीकरण आणि पुर्नवापर माध्यमातून करण्यात येणार आहे. शहरातील औद्योगिक भाग तसेच हिंजवडी, चाकण, तळवडे येथील एमआयडीसीच्या भागात प्राधान्याने हा पाणीपुरवठा करून बचत होणारे पाणी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्यात येणार आहे. प्रक्रीयायुक्त पाण्याच्या वितरणाकरिता संपूर्णपणे नवीन जाळे आर्थिक दृष्ट्‌या व्यवहार्य नसल्याने 607 किलोमीटरचे प्राथमिक जाळे उभारणे आवश्‍यक आहे. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रीया केलेले पाणी या भागात नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम व्यवसायासाठी आणि सोसायट्यांसाठी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी करण्याचे प्रस्तावित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)