महापालिका शाळेत सीसीटीव्ही बसविणार कधी?

आयुक्‍तांना निवेदन : प्रशासनाचे प्रयत्न अपुरेच

पुणे – शाळांमधूनही विद्यार्थ्यांसोबत अनेकवेळा गैरप्रकार केले जात असल्याचे समोर आले असतानाही अद्याप शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केली जाते तर महापालिका शाळांमध्ये का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महानगरपालिकेच्या शाळा “हायटेक’ केल्याचा दावा केला जात असताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही का लावण्यात आले नाहीत, असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उपस्थित केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 310 शाळा चालविण्यात येतात. यामधून सुमारे 90 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर काही शाळामध्ये सीसीटीव्ही असूनही त्याचा उपयोग नाही अशी स्थिती आहे.

येरवडा येथील महापालिका शाळेमध्ये सुरक्षा रक्षकानेच एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मनविसेचे म्हणणे आहे. शाळांमधील सुरक्षा रक्षक आणि केअर टेकर यांच्या वर्तनाबाबतही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणीही मनविसेने केली आहे.

महापालिका शाळांमध्ये कॅमेरे बसवताना ते वर्गनिहाय बसवावेत तसंच प्रवेशद्वारांवर बसवावेत जेणेकरून शाळेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवता येईल, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसे पत्र मनविसेने महापालिका आयुक्तांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)