महापालिका शाळांसाठी शैक्षणिक धोरण तयार करा

पिंपरी – महापालिका शिक्षण विभागावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. परंतू, त्यातून अधिक फलनिष्पती होताना दिसून येत नाही. पालिका शाळेसाठी कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक धोरण नाही. यामुळे खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. यासाठी महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक व भाजपचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी महापालिकेकडे केली आहे. या धोरणाअंतर्गत शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल. पालिका शाळेतील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत 136 प्राथमिक व 18 माध्यमिक शाळा मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका शाळेच्या इमारीत सुसज्ज आहेत. शिक्षण विभागावर पालिका दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. परंतु, पालिकेचे शैक्षणिक धोरण नाही. नाविन्यपूर्ण शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. तसेच खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. प्रवेश शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जाते. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे पालिका शाळांसाठी उत्तम शैक्षणिक धोरण निश्चित करावे. जेणेकरुन पालिका शाळांकडे पालक वर्गांचा देखील कल वाढेल. ते आपल्या पाल्याला पालिका शाळेत दाखल करतील. तसेच यामुळे करदात्यांच्या पैशांचा करदात्यांच्याच मुलांवर खर्च होईल, यासाठी पालिकेने नवीन शैक्षणिक धोरण करणे आवश्यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, नामांकित व्यावसायिक आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी एक उत्तम शिक्षण धोरण निश्चित करावे. त्यामध्ये योगा, इंग्रजी भाषा, संगणकाचे ज्ञान देणे बंधनकारक करावे. तसेच महापालिका शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावे. 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना ‘स्किल डेव्हलपमेंट’, देश, राज्य सेवा या सांरख्या स्पर्धा परीक्षेबाबतचे मार्गदर्शन करावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयातच स्पर्धा परीक्षेबाबतची माहिती मिळेल. त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. त्यामुळे शहरातून अधिका-अधिक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होतील.

मातृभाषेवर सर्वांचे प्रेम असणे आवश्यक आहेच. त्याबरोबर इंग्रजी भाषा देखील अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. सर्व शाळांमध्ये संगणक तज्ज्ञ, प्रशिक्षक नेमण्यात यावेत. शाळांमध्ये पाणी, स्वच्छता, फर्निचर, रंगरोटी करण्यात यावी. शाळा आकर्षक असेल तर विद्यार्थीही पालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्यास तयार होतील. आयुक्तांनी शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होतो की नाही, याची पाहणी करावी.

दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बक्षीस देण्यात येते. 90 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले जाते. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. परंतु, एकाचवेळी पैसे दिल्यास विद्यार्थ्यांकडून त्याचा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवीच्या शिक्षणापर्यंतचे परीक्षा शुल्क भरावे. जेणेकरून विद्यार्थ्याला याचा फायदा होईल, असेही नायर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)