महापालिका रणसंग्राम २०१८: घोळ निस्तारला, आता गोपनीय चौकशी!

मतदार यादीचा घोळ :  जिल्हा प्रशासन गंभीर, महापालिकेचे अधिकारी रडारवर

नगर: महापालिकेच्या मतदार यादीत घोळाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, याची चौकशी गोपनीय पातळीवरून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार ही चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती या घोळाची चौकशी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या चौकशीमुळे मतदार यादीत घोळ घालणारे महापालिकेचे अधिकारी रडारवर आले आहेत.

मतदार यादीत घोळ असल्याची तक्रार इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला होता. विरोधकांना आर्थिक बळाचा वापर करत, महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोळ केल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तरप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला होता. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रारही केली होती. मतदार यादीविषयी सुमारे 1 हजार 800 तक्रारी दाखल झाल्या होत्या. मतदार याद्यातील घोळासंदर्भात तक्रारी वाढताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्याची गंभीर दखल घेतली. हा घोळ निस्तारण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेवर जबाबदारी सोपावली.

उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समांतर अशी मतदार यादीची चौकशी केली. त्यानुसार हा गुंता मोठा असल्याचे समोर आले. मार्गदर्शन करताना या घोळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आले. हा घोळ निस्तारण्यासाठी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीचे पुनरावलोकन करण्यात आले. यात ज्या-ज्या भागातील मतदार यादातील तक्रारी होत्या आणि मतदार वेगवेळ्या प्रभागात विभागले गेले होते, ते पुन्हा जागेवर एकत्रित आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महापालिकेची अंतिम मतदार यादी निश्‍चित झाली आहे. हा यादी प्रसिद्ध होताना हा मतदार यादीचा घोळ देखील सुटला आहे. इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांच्या घोळ निस्तारल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या यादीतील घोळाविषयी सुरूवातीला झालेल्या तक्रारीनुसार जिल्हा प्रशासनाने याची चौकशी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मतदार यादीतील घोळ हा तांत्रिक होता, की पूर्वनियोजित “आर्थिक’ होता याची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत झाल्याचेही समजते. ही चौकशी निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे होणार असल्याचे समजते. परंतु या चौकशीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने या मतदार यादीतील घोळाच्या चौकशीमुळे महापालिकेत मतदार याद्यांचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी रडारवर आले आहेत. ही चौकशीची व्याप्ती वाढल्यास महापालिकेतील अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शिवसेनेच्या आरोपामुळे चौकशी गंभीर

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत घेत मतदार याद्यातील घोळ हा पूर्वनियोजित आणि त्यामागे “आर्थिक’ तडजोडींचे कारण असल्याचा आरोप केला होता. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्या अधिकाऱ्याविरोधात वेळप्रसंगी पुरावे देखील देऊ, असा दावा केला होता. शिवसेनेच्या “आर्थिक’ आरोपाची दखल जिल्हा प्रशासानेने, विशेष करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतली आहे. त्यामुळे मतदार याद्यांतील घोळाची चौकशी गंभीर वळण घेणार असल्याचे दिसते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)