महापालिका रणसंग्राम २०१८: राष्ट्रवादीची 68 इच्छुकांची “ब्लू प्रिंट’ तयार!

आघाडीचा निर्णय दिवाळीनंतर : राष्ट्रवादीकडून इच्छुकांना प्रभागात तळ ठोकून राहण्याची सूचना

प्रदीप पेंढारे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे गुऱ्हाळ प्रदेश पातळीवर अडकले आहे. राष्ट्रवादीला अपेक्षित असलेला प्रतिसाद कॉंग्रेसकडून मिळत नाही. कॉंग्रेसची जागा वाटपासंदर्भात अवास्तव मागणी आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णयही लांबवणीवर पडत चालला आहे. आघाडीचा निर्णय प्रदेशपातळीवर जेव्हा होईल, तेव्हा होईल, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेच्या 17 प्रभागांमधील इच्छुक 68 उमेदवारांची ब्लू प्रिंट तयार केली आहे. इच्छुकांचा ही ब्लू प्रिंट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडेही पोहचविण्यात आली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत 2003 पासून आघाडी आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी नव्हती. त्याचे फळ सत्ता गमाविण्यात झाले. तेथून धडा घेतलेल्या कॉंग्रेसने जनसंघर्ष यात्रा राज्यभर काढून वातावरण निर्माण केले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ही जनसंघर्ष यात्राही दाखल झाली होती. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा मरगळलेल्या कॉंग्रेसला उभारी देणारी ठरली. परंतु या यात्रेचा समारोप शहरात होण्याऐवजी ग्रामीण भागात झाला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्येबरोबर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युतीचे चिन्ह धुसर आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र त्याला अंतिम रुप दिवाळीनंतर येणार आहे. तोपर्यंत बरच पाणी पुलाखालून जाणार आहे. कॉंग्रेसची जागासंदर्भातील अवास्तव मागणी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी ठरत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी निवडणुकीची धुरा आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपावली आहे. स्थानिक पातळीवर या दोन्ही नेत्यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. कॉंग्रेसचे जागा वाटपाचा निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, डॉ. सुजय विखे पाटील हे घेणार आहेत. ही निर्णय प्रक्रिया लांबणार याचा अभ्यासही राष्ट्रवादीच्या आमदार जगताप दुहींनी केला आहे. त्यातूनच आघाडीचा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा होईल, हे लक्षात घेऊन आमदार जगताप दुहीने प्रभाग 17 मध्ये इच्छुक 68 उमेदवारांचा आराखडा तयार करून ठेवला आहे. जुने आणि नवे, अशी कार्यकर्त्यांची सांगड घालून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिली आणि दुसरी फळीतील कार्यकर्त्यांना न्याय देणारा असा हा आराखडा असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांना प्रभागातच तळ ठोकून काम करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवार प्रभागामध्येच दिसत आहेत. राष्ट्रवादीमध्ये सध्या एकसंघ आणि निर्णय प्रक्रिया दिसत आहे. निर्णय प्रक्रियेत शांतता आणि अंमलबजावणी दिसत आहे. राष्ट्रवादीची ही शांत चाल विरोधकांना धसका लावणारी ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कॉंग्रेसकडून जागा वाटपासंदर्भात योग्य प्रस्तावाची वाट पाहत आहे. आघाडीचा निर्णय दिवाळीनंतर अपेक्षित आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांना कामाला लागा अशाच सूचना आहे. वेळप्रसंगी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेऊन, निवडणुकांना समोरे जाऊ.
– आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस

आघाडीचा निर्णय मुंबईला 14 तारखेला होणार आहे. प्रदेशच्या नेत्यांकडे अपेक्षित जांगाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावरून आघाडीसंदर्भात वरिष्ठपातळीवर चर्चांच्या फेऱ्या सुरू आहे. वरिष्ठांकडून जो निर्णय येईल, तो मान्य करून काम सुरू करू.
– दीप चव्हाण, शहर-जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या खेळीची भीती

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला, तरी सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होईल, असे चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे शहरातील संघटने हे कॉंग्रेसपेक्षा अधिक प्रबळ आहे. कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले राष्ट्रवादीच्याही अधिक संपर्कात आहेत. आमदार संग्राम जगताप यांचा शब्द कॉंगेसमधील “यंग’ अधिक ऐकतात, हाही इतिहास आहे. प्राबल्य असलेल्या प्रभागातमध्ये राष्ट्रवादी अपक्ष देऊन खेळ करू शकते, ही भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय घेताना राष्ट्रवादीला अधिकच विश्‍वासात घेऊन करावी लागणार असल्याचे कॉंग्रेसमधील जाणकारांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)