महापालिका भवनातील “डर्टी पिक्‍चर’ अधिकाऱ्यांना दिसणार का?

थुंकीबहाद्दरांनी रंगविल्या भिंती : शहरात कारवाई, स्वच्छतेचा नुसताच बोभाटा

पुणे – महापालिकेने संपूर्ण शहरात स्वच्छतेचा “ड्राईव्ह’ सुरू करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तब्बल 397 थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाईला सुरूवात केली आहे. परंतु महापालिका भवनाच्या आवारात मात्र “दिव्याखाली अंधार’ असेच म्हणावे लागेल. येथील आवारात आणि इमारतीत भिंतींवर आणि कोपऱ्यांमध्ये थुंकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे शहर स्वच्छतेचा बोभाटा करणाऱ्या महापालिकेतच “डर्टी पिक्‍चर’ दिसत आहे.

-Ads-

केवळ महापालिका भवनच नव्हे, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींचीही तीच स्थिती असल्याचे दिसून येते. महापालिका भवनात कामानिमित्त रोज हजारो नागरिकांची जा-ये असते. त्यातील अनेकजण पान, गुटखा, तंबाखू तत्सम पदार्थ खाणारे असतात. महापालिका भवनात पोहोचल्यानंतर इच्छित कार्यालयात जाण्याआधी तोंडात भरलेला या पदार्थांचा “बकणा’ त्यांना कोठेतरी रिता करायचा असतो. त्यासाठी हे थुंकीबहाद्दर रस्ता किंवा कोपरा याचा आधार घेतात. महापालिका आवारात आल्यानंतर ज्या ठिकाणी वाहने लावली जातात, त्याठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत. वाहन पार्क केल्यानंतर तेथेच पान, तंबाखू खाऊन पिंक टाकली जाते. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचा पाय त्यावर पडतो आणि शिसारी येते. एवढेच नव्हे तर त्याठिकाणी ठेवलेल्या शोभेच्या झाडांच्या कुंड्या आणि भवनाच्या कडेला लावलेल्या शोभेच्या झाडांच्या मातीतही पिंक टाकली जाते, त्यामुळे दुर्गंधी येते.

महापालिका भवनातील स्वच्छतागृहांमध्ये अशाप्रकारे झालेल्या घाणेरड्या प्रकारांमुळे कित्येकदा अनेकांनी स्वच्छता विभागाकडे तक्रारही केली आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वच्छतागृह बंदिस्त असले तरी ते सार्वजनिक आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांकडून त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणेही अत्यंत आवश्‍यक आहे.

संपूर्ण शहरात महापालिकेने स्वच्छ शहराची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी 700 अधिकारी 41 पथके कामाला लावली आहेत. त्यामध्ये खुद्द महापालिका आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख, उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश केला आहे. तसेच शहर स्वच्छतेसंबंधी जाहीर प्रकटन देण्यात आले असून, विविध कृतींना दंड आकारण्यात आला आहे. त्यातील सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या कृतीवरही दंड लावला असून, त्याची वसुली सुरू केली आहे. 397 जणांवर कारवाई करून 44 हजार 50 रुपयांची वसुली महापालिकेने केली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

महापालिका भवनात कोपऱ्यात थुंकणाऱ्यांवर कारवाईबाबत विचार केला नव्हता. मात्र, बुधवारपासूनच (दि. 14) महापालिका भवनात पथक तैनात केले जाईल.
– ज्ञानेश्‍वर मोळक, घनकचरा विभाग प्रमुख


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)