महापालिका प्रशासनात लवकरच उलथापालथ!

– शहर अभियंता, सहशहर अभियंतापदाला धक्का

– विकास शिंदे

-Ads-

पिंपरी – महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ ते शहर अभियंतापदावरील दिलेल्या पदोन्नतीत लवकरच उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्थापत्य अभियांत्रिकीची एकत्रीत सेवाज्येष्ठता यादी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन विभागाने हालचाली सुरु केल्या असून, पदविकाधारक आणि पदवीधारक संवर्गाच्या सेवाज्येष्ठता एकत्रित यादी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर अभियंता, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या पदोन्नतीत बदल होणार आहेत.

श्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरवणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ ते शहर अभियंतापदावर पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादी डावलून डिग्रीधारकांना अभियंत्याना वरिष्ठपदावर पदोन्नती दिल्या आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अनेक डिप्लोमा झालेले अभियंता हे वरिष्ठ पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत डिप्लोमाधारक अभियंत्यानी महापालिका प्रशासन विभागाने डिग्रीधारक अभियंत्यांना दिलेल्या पदोन्नतीवर त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. परंतु, महापालिका प्रशासन विभागातील अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे डिप्लोमाधारक अभियंता तब्बल 13 वर्षे अन्याय विरोधात लढावे लागले आहे. याविषयी संबंधित डिप्लोमाधारक अभियंत्यांनी वारंवार नगरविकास विभागाकडे तक्रार करुन डिग्री व डिप्लोमा अभियंत्याची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी करण्याबाबत पाठपुरावा केला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1983 मध्ये लागू करण्यात आला. त्यानुसार अधिका-यांच्या नेमणुका, पदोन्नती, सेवाज्येष्ठता महापालिका करत आहे. महापालिकेच्या ठरावानूसार प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पदोन्नती दिलेल्या आहेत. त्यावर आर.व्ही. शिंदे यांनी 2008 मध्ये पदोन्नतीवर आक्षेप घेवून एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करावी, तसेच सतीश वाघमारे यांनीही एक-एकनुसार पदोन्नती देण्यात येवू नये, पदविकाधारक, पदवीधारक यांची एकत्रित सेवाज्येष्ठता तयार व्हावी, अशी मागणी प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानंतर 2013 मध्ये डिप्लोमा आणि डिग्रीधारक अभियंत्याची पदोन्नतीच्या वादाला सुरुवात झाली. तसेच, राज्य शासनाकडे केलेल्या तक्रारीनुसार डिग्री व डिप्लोमाधारक अभियंत्याची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करुन त्यानुसार पदोन्नती देण्यात येणार आहे. पदोन्नती दिलेला अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवावा लागणार आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता या पदावरील सगळ्या दिलेल्या पदोन्नतीची एकत्रित यादी होणार आहे. अधिका-यांची पालिकेत सेवा सुुरु झाल्यापासून ही यादी बनविण्यात येणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंतापदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.

दरम्यान, सदरील प्रकरणी अधिक विलंब झाल्यास महापालिकेच्या प्रशासन विभाग अधिका-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच, स्थगिती आदेशाची अंमलबजावणी करुन सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशास अनुसरुन एकत्रित सेवाज्येष्ठता यादी करणे व फेरनिवड सूची तयार करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश कक्ष अधिकारी दिलीप वणिरे यांनी दिले आहेत.

14 उपअभियंत्याचे लवकरच पदावतन…
महापालिका प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अधिका-यांना 1 डिसेंबर 2016 मध्ये कनिष्ठ अभियंत्याना उपअभियंता पदावर पदोन्नती दिली होती. यामध्ये संदेश खडतरे, सुनिल अहिरे, चंद्रकांत मुठाळ, शशिकांत दवंडे, विजयसिंह भोसले, महेश बरिद्रे, मोहन खोंद्रे, संजय साळी, सुभाष काळे, सुनिल शिंदे, सुर्यकांत मोहिते यांच्या पदोन्नतीला शासनाने स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानूसार कनिष्ठ अभियंता संवर्गाची फेरनिवड सूची तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे 14 उपअभियंता लवकरच कनिष्ठ अभियंता पदावर पदावतन होणार आहेत.

…हे आहेत संभाव्य अधिकारी?
महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण (सहशहर अभियंता), सहशहर अभियंता राजन पाटील (कार्यकारी अभियंता), कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, प्रमोंद ओंबासे, सतीश इंगळे, प्रवीण लडकत, रामचंद्र जुंधारे हे अधिकारी (उपअभियंता) पदावर पदावतन होण्याची दाट शक्‍यता आहे. तसेच सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर (शहर अभियंता), कार्यकारी अभियंता संजय कांबळे (सहशहर अभियंता), जीवन गायकवाड (सहशहर अभियंता) या पदावर पदोन्नती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन विभागाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)