महापालिका निवडणूक यंत्रणेवर मुख्यमंत्र्यांचा दबाव -अनिल राठोड

सेनेच्या उमेदवारांना प्रभागात फिरू देत नाही : राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजपकडून गुंडगिरी सुरू 

नगर: महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेवर सत्ताधारी भाजप व मुख्यमंत्र्यांचा मोठा दबाव आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना प्रभागात प्रचारासाठी देखील फिरू दिले जात नाही. त्यांच्या मागे माणसे पाठवून अडचणी वाढविण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह भाजपची गुंडगिरी सुरू झाली असून मतदानाच्या दिवशी काहीही घडू शकते, पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून बोगस मतदान होण्याची शक्‍यता आहे. त्याची वेळीस निवडणूक यंत्रणेने दखल द्यावी, अशी मागणी माजी आमदार अनिल राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, घनश्‍याम शेलार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीचे नियम सर्व पक्षांना लागू हवेत मात्र तसे होत नाही. परवानग्या रखडवल्या जात असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचार करणे अवघड झाले आहे. निवडणूक यंत्रणेवर भाजपचा दबाव तर प्रभागात राष्ट्रवादी दहशत करत आहेत. प्रभाग 1 व 15 मध्ये आमच्या उमेदवारांच्या मागे माणसे सोडली जात आहेत. अशामुळे शेवटच्या दिवशी काहीही घडू शकते.

मतदारांना या मतदानापासून वंचित ठेवण्याचा, पैसे वाटपाचा, दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडू शकतो,असा आरोपही राठोड यांनी केला. याबाबत राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांना पत्र देऊनही दखल घेतली जात नाही. शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचाराच्या परवानग्यासाठी रखडवले जात आहे. कागदपत्रांची मागणी करुन उमेदवारांना परवानगीसाठी 8 ते 10 तास लावले जात आहेत. अनेक प्रकारांबाबत तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.

भाजपच्या प्रचाराच्या विना परवान्याची 38 वाहने शहरात फिरत आहेत. त्याची दखल घेतली गेली गेली नाही. यातील 5 वाहने शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडून दिली. मात्र आरटीओने कारवाई न करताच सोडून दिली. गृहराज्यमंत्रीपद सेनेकडे असले तरी त्यावरील कॅबिनेट पद मुख्यमंत्र्यांकडेच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सहारिया यांना नगरच्या दौऱ्यात पत्र दिले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी 300 कोटींचे आमीष दाखवून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर कारवाई नाही. भाजपची पक्षचिन्ह अजूनही पथदिव्यांवर आहेत. ते काढले गेले नाहीत. त्याबाबत सहारिया यांना सांगितल्यावर जिल्हाधिकारी पक्षचिन्ह खूप उंचीवर लावल्याने काढता आले नाहीत, अशी उत्तरे देत आहेत, ही सगळी बनवेगिरी असल्याचा आरोप राठोड यांनी केला. भाजपने प्रत्येक प्रभाग मंत्र्यांना वाटून दिला आहे. यांचाही अधिकाऱ्यांवर दबाव येत आहे, असाही आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्ष एकाकी झाले आहेत. भाजप सत्तेचा वापर करुन तर इतर पक्ष अन्य मार्गाने दडपण आणत आहेत, अशीही तक्रार राठोड यांनी केली.

शिवसेना विकासाच्या मुद्यांऐवजी पुन्हा भावनिक मुद्दे घेऊन प्रचार करत आहे. या विरोधकांच्या आक्षेपांवर बोलताना राठोड म्हणाले की, शहराचा विकास शिवसेनेमुळेच झाला. आम्ही शहरात तीन मॉडेल रस्ते तयार केले. पाणी योजना मंजूर करुन आणली, पिंपळगाव माळवीची जमीन मनपाच्या नावावर केली. विरोधकांकडे सांगण्यासारखा एकही विकासाचा मुद्दा नाही. ते 300 कोटी आणणार असतील तर आम्हीही राज्य सरकारकडून 3 हजार कोटी आणू.

शहर राज्यातील “टॉप टेन’ शहरांपैकी एक बनवून दाखवू, सेनेमुळेच शहरात शांतता आहे व त्यामुळेच एमआयडीसीत कारखाने येत आहेत, असा दावा त्यांनी केला. सत्तेचा गैरवापर करुन आम्हाला अडकवले, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यावर बोलताना राठोड म्हणाले की, केडगावमधील दोघांचा खून हा काही भावनिक मुद्दा नाही, ती सत्य घटना आहे. अडकावयाचे असते तर यापूर्वीच अडकवले असते. मी मंत्री होतो तेव्हाही शकलो असतो. पोलिसांच्या अहवालात आमच्यावर आरोप केले आहेत, तो अहवाल त्यांनी पैसे देऊन फोडला, त्यामुळे शिवसेनेवर होणारा आरोप बोगस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)