महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

मतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वतयारीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण 

नगर – महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीची लगबग आता अंतिम टप्प्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने त्यादृष्टीने सर्व सज्ज तयारी केली आहे. निवडणूक विषयक कोणत्याही प्रकारच्या कामात कसूर राहू नये, याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. प्रत्येक प्रक्रिया ही परिपूर्ण असावी, यासाठी सर्व सहभागी यंत्रणा आणि त्यासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 9 डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याची मतमोजणी 10 डिसेंबरला होणार आहे.

मतमोजणीसाठी केल्या जाणार असलेल्या तयारीची माहिती यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या पूर्वतयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमास निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले.उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याविषयी सविस्तर आणि तपशीलवार मार्गदर्शन केले.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त (निवडणूक) सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम, गोविंद दाणेज, शाहूराज मोरे, उज्वला गाडेकर, जयश्री माळी, प्राजीत नायर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, सुधीर पाटील, उमेश पाटील, माणिक आहेर, एफ. आर. शेख, सदाशिव शेलार उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी ही शहरातील भवानीनगर येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे. मतमोजणी कक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी यांची बैठकव्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठीच्या आवश्‍यक उपाययोजना या अनुषंगिक बाबींसोबतच प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया कशी सुरु करावी, याचे सादरीकरण आनंदकर यांनी यावेळी केले. या संदर्भात असलेल्या विविध शंका आणि प्रश्‍नांचेही त्यांनी निराकरण केले.

मोबाईल मतमोजणी कक्षात प्रतिबंध 

मतमोजणी कक्षात व मतमोजणी कक्षाच्या आवारात उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी (काऊटींग एजंट) यांना मोबाईल फोन अथवा इलेक्‍ट्रॉनिक उपकरण घेऊन येण्यास सक्‍त मनाई आहे. मोबाईल फोन अथवा इलेक्‍टॉनिक उपकरण सोबत आणल्यास ते मतमोजणी कक्षाच्या बाहेर 200 मीटर अंतराच्या बाहेर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची राहील याची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)