महापालिका निवडणुकीची मती भ्रष्ट करणारी भानामती! 

-शहराच्या मध्यवर्ती भागात जादूटोण्याच्या प्रयोगाची खमंग चर्चा
-उमेदवारांकडून कारवाई करण्याची मागणी 

नगर – महापालिका सर करण्यासाठी उमेदवारांची आता मती भ्रष्ट पडू लागली आहे. विरोधकांवर मात करता यावी यासाठी काळ्या जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत. हे प्रयोग शहराच्या मध्यवर्ती भागात होत असल्याने या काळ्या भानामतीची शहरभर खमंग चर्चा आहे. यावर उतारा देखील काहींशी शोधला आहे. “रात्री आठनंतरचा एकच पॅग…’, असा हा “रामबाण’ उपाय! महापालिका निवडणूक ही आता अंधश्रद्धेभोवती फिरू लागली आहे. हा प्रकार उमेदवारांबरोबर मतदारांचे मत विचलीत करणारा आहे. त्याचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.

-Ads-

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जिंकण्यासाठी सर्व कस पणाला लावला आहे. महापालिकेचा गड सर करायचाच, हा त्यामागील उद्देश आहे. त्यासाठी कोणत्याही मार्गाने मतदारापर्यंत पोहचायचे. चर्चेत राहायचे. प्रभागात आपली हवा राहिली पाहिजे, असे वातावरण तयार करायचे.

यासाठी विविध क्‍लृप्त्यांचा आधार घेतला जात आहे. आता तर हा प्रकार एवढा शिगेला पोहचला आहे, की काळ्या जादूचा आधार घेतला जाऊ लागला आहे. ही भानामती म्हणजे उमेदवारांची मती भ्रष्ट झाल्याचे उदाहरण आहे. जिंकण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेणारे शहराचा काय विकास साधणार, असाचा प्रश्‍न याद्वारे केला जाऊ लागला आहे. महापालिकेची ही निवडणूक सुशिक्षित उमेदवारांनी अंधश्रद्धेच्या बाजारात नेऊन बसविल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार पत्रक घेऊन त्यावर अंडे, बकरीचे पाय, दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, बुका, कुंकू, हळद टाकून ते रस्त्यावर फेकून दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असा प्रकार झाला आहे. सावेडीनंतर नगरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पटवर्धन चौकात हा प्रकार झाला आहे. या जादूटोण्यामागाचा सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. या आघोरीचा प्रकाराचा उमेदवारांनी चांगलाच धसका घेतला आहे. आपल्या उमेदवाराला सावरण्यासाठी कार्यकर्ते या “आघोरीचा’ शोध घेत फिरत आहेत.

हे जादूटोणाचे साहित्य बघून अनेकजण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावत आहेत. दोनच बाहुल्या असल्याने चारपैकी दोन उमेदवारांवर जादूटोणा करण्यात आला आहे. मात्र, ते दोघे कोण? हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्यांचा तपास करून त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पोलिसांचे गस्तिपथक काय करते? 
हे भानामतीचे प्रयोग मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शहरात गस्तपथक नेमले आहेत. रात्री अकरानंतर शहरात कोणालाही फिरू दिले जात नाही. अशातच भानामतीचे हे प्रकार रंगले आहेत. भानामतीचे प्रयोग रस्त्यावर होत असल्याने पोलिसांच्या गस्तीपथकाच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)