महापालिका ताब्यात अन्‌ जगताप नदीपात्रात

जलपर्णी अभियानात सहभागः निष्क्रीय कारभारावर चुप्पी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे जलपर्णी हटवण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांना नदीपात्रात उतरावे लागले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे देखील आज या अभियानात उतरले. अख्खी महापालिका ताब्यात असताना जगताप जलपर्णी काढण्यासाठी स्वतः नदीपात्रात उतरल्याने शहरवासियांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. चिंचवड रोटरी क्‍लबच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी पुढाकार घेत जलपर्णीमुक्त अभियान हातात घेतले आहे. दर रविवारी हे अभियान राबवून नदीपात्रातील जलपर्णी हटवली जाते. परंतु, वेळीच जलपर्णी काढली न गेल्याने ती नियंत्रणात आणणे अशक्‍य झाले आहे. महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी गतवर्षी सुमारे 37 लाख रुपये खर्चाचे कंत्राट ठेकेदाराला दिले आहे. मात्र, बहुसंख्य भागातील जलपर्णीला ठेकेदाराने हातही लावला नाही. परिणामी आता नदीपात्रात पुन्हा जलपर्णी फोफावली आहे.

उन्हामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. बहुसंख्य भागात ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी, त्यावर फोफावलेली जलपर्णी आणि उन्हाची तीव्रता यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना उग्र स्वरुपाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दिवसं-रात्रं डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आधीच उकाड्याने झोपेचे खोबरे होत असताना त्यात डासही सर्वांगावर तुटून पडत असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही भाजपचेही या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

जलपर्णीच्या प्रश्‍नावरुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित असताना आज आमदार जगताप यांच्यासह काही सत्ताधारी नगरसेवक जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात उतरले. काही मिनिटांसाठी त्यात सहभाग नोंदवत त्याचे फोटोसेशनही केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. महापालिका प्रशासनावर अंकुश नसताना शो बाजी करण्याची सत्ताधाऱ्यांना गरज काय, असा सवाल या मोहिमेत सहभागी काही कार्यकर्त्यांनी केला.

रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या पुढाकाराने आणि अन्य विविध संस्थांच्या मदतीने हे अभियान मागील 176 दिवसांपासून सुरु आहे. याकामासाठी जर यंत्राची जोड मिळाली तर सध्या जोरात सुरु असलेले काम आणखी वेगात होईल. कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का याबाबत महापालिकेला सूचना देण्यात येणार असून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक संस्थांना अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना लवकरच आखण्यात येईल. नदी प्रदूषण हा सध्याचा सर्वात गंभीर विषय आहे. याबाबत वेळीच काम केले नाही तर मानवी जीवन धोक्‍यात येईल.
– लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)