पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून अनेक वारेमाप खर्चांना फाटा देऊन काटकसर व बचतीचे धोरण राबविले जात असतानाच, महापौर राहुल जाधव यांनी स्वत:च्या वापरासाठी चक्क पालिकेच्या खर्चातून “टॅब’ विकत घेतला आहे. तब्बल 74 हजार रूपयांचा हा महागडा टॅब आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे काटकसर व बचतीचे धोरण निव्वळ दिखाव्यापुरते असल्याची टीका होऊ लागली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता घालवून गेल्या वर्षी फेब्रुवारीत भाजपने महापालिकेचा कारभार ताब्यात घेतला. पारदर्शक व शिस्तबद्ध कारभाराचा नारा देत भाजपने कारभार सुरू केला. त्यात अनेक नवे धोरण जाहिर करीत नागरिकांकडून शाब्बासकी मिळविली. त्यातील एक धोरण म्हणजे अनावश्यक खर्चाला फाटा देणे. काटकसर व बचतीचे धोरण राबवून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे. पालिकेचे वाहन न वापरता स्वत:चे वापरण्यास काही पदाधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे. पुष्पगुच्छ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह खरेदी बंद करणे. दरवर्षी डायरी न छापणे. मैदान व पटांगणात कार्यक्रम न घेता पालिकेच्या नाट्यगृह किंवा सभागृहातच कार्यक्रम घेणे. अशा विविध माध्यमातून पालिकेची आर्थिक बचत केली जात आहे.
असे असले तरी, दुसरीकडे अनावश्यक गोष्टींवर वारेमाप उधळपट्टी कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. भाजपचे दुसरे महापौर जाधव यांनी स्वत:च्या वापरासाठी टॅब घेतला आहे. त्याची किंमत 74 हजार इतकी आहे. पालिका सभा कामकाज, शहरातील समस्या, नागरिकांची विविध कामे तसेच, कार्यालयीन कामकाज सुलभतेने करण्यासाठी प्रसिद्ध कंपनीचा महागडा टॅब खरेदी केल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. टॅब खरेदी करून त्याचा वापर महापौरांनी सुरूही केला आहे.
स्थायी समितीसमोर प्रस्ताव…
दरम्यान, मागील महिन्यात स्पेनमधील बार्सिलोना दौऱ्यावर सव्वा वीस लाखांचा खर्च पालिकेकडून करण्यात आला. त्यावर शहरभरातून मोठी टीका झाली. पालिकेच्या कररूपी पैश्यातून उधळपट्टीच्या कारणांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी भाजप काटकसर व बचतीच्या नावाखाली प्रत्यक्षात उधळपट्टी करीत असल्याची टीका शहरातून होऊ लागली आहे. सदर खर्चाचे अवलोकनाचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि.4) होणाऱ्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा