महापालिका कारवाई ठरली कुचकामी

कारवाईनंतर पुन्हा अनधिकृत जाहिरात फलक उभे : प्रशासनाचे दुर्लक्ष


अडीच महिन्यांत 200 हून अधिक होर्डिंग जमीनदोस्त


उंचीबाबत नवीन धोरण करून उंचीवरील होर्डिंग जमीनीवर

पुणे – मंगळवारपेठ येथील दुर्घटनेनंतर महापालिकेकडून शहरातील तब्बल 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग गेल्या अडीच महिन्यांत काढण्यात आली आहेत. मात्र, महापालिका कारवाई करून पुढे जाताच ही होर्डिंग पुन्हा उभी राहात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या होर्डिंगबाबत अतिक्रमण निरीक्षकांना माहिती असूनही त्यांच्याकडून असे प्रकार पाठिशी घातले जात आहेत.

ऑक्‍टोबर महिन्यात मंगळवारपेठ येथील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर न्यायालय तसेच महापालिकेतील नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. सुमारे 200 हून अधिक होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली; तसेच उंचीबाबत नवीन धोरण करून त्यानुसार उंचीवरील होर्डिंग जमीनीवर आणण्यात आली. तर, या दुर्घटनेनंतर दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीत महापालिकेची न्यायालयाने कानउघडणी केल्याने, महापालिका प्रशासनाकडून क्षेत्रीय कार्यालयांचे प्रमुख सहायक महापालिका आयुक्तांकडे होर्डिंगची जबाबदारी दिली असून अनधिकृत होर्डिंग आढळल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. असे असतानाच पालिकेने काढलेले होर्डिंग पुन्हा उभे केले जात असल्याचे समोर आले आहे. धायरी उड्डाणपूलाच्या बाजूला असलेल्या एका अनधिकृत फलकावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जाहिरात फलक उभारला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने केलेली कारवाई कुचकामी ठरली असून पुन्हा अनधिकृत होर्डिंग उभे राहण्यास सुरुवात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजकीय दबावामुळे दुर्लक्ष
महापालिकेने केलेली पहिली कारवाई न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी या कारवाईस कोणीही विरोध केला नाही. मात्र, आता पुन्हा नव्याने फलक लावताना,राजकीय दबाव येत असल्याचे पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून सांगण्यात येत आहे. एकदा कारवाई केली असल्याने पुन्हा करू नका, असे अधिकाऱ्यांना तसेच आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी माहिती असून कारवाई होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कारवाई झालेल्या जागेवर पुन्हा होर्डिंग उभे राहाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या होर्डिंगवर तातडीने कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधीत क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह निरीक्षकांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, योग्य ती कारवाई केली जाईल.

– विजय दहिभाते,उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)