महापालिका उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प

20 हेक्‍टर जागेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी


महापालिकेचा दैनंदिन विजेचा भार 90 मेगावॅट


पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प

पुणे – महापालिकेसाठी लागणारी विजेची गरज 100 टक्‍के सौर उर्जेतून पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेचा दैनंदिन विजेचा भार 90 मेगावॅट असून ही विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार असून या प्रकल्पासाठी 20 हेक्‍टर जागेची मागणी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

शहरातील पदपथ, महापालिकेची कार्यालये, तसेच प्रकल्पांसाठी महापालिकेस दरवर्षी वीज लागते. ही वीज महापालिका महावितरणकडून खरेदी करते. त्यासाठी पालिकेस दरवर्षी 60 कोटी रुपये खर्च करावा लागतो. तसेच वाढत्या विजेच्या दरामुळे हा खर्च वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून सौर सिटीचा प्रस्ताव “मेडा’कडे पाठविला होता. मात्र, नंतर तो बारगळला त्यानंतर मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात महापालिकेच्या प्रलंबित प्रश्‍नांची बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सवलत तसेच अनुदान मिळण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांनी पालिकेने स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा त्यासाठी आवश्‍यक असलेला निधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान महापालिकेस उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या तसेच या प्रकल्पासाठी शहरात एकाच ठिकाणी सुमारे 20 हेक्‍टर जागा उपलब्ध नसल्याने पालिकेस ही जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास पाठविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)