महापालिका अधिकाऱ्यांना खडेबोल

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानाच्या अनुशंगाने शहराच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. ती वेळेत पूर्ण करण्यात यावीत. या कामाचा आढावा घेण्यासाठी पंधरा दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल, अशा विकास कामांच्या मुद्यांवर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (दि. 29) आढावा बैठकीत चर्चा केली.

यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त अच्युत हांगे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालय अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, आरोग्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी एखाद्या नगरसेवकाला प्रभागातील काम सांगायचे असल्यास कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे, असा प्रश्‍न आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारण्यात आला. हे प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्याची प्रशासकीय पुस्तिका तयार करण्याच्या सूचना जगताप यांनी केल्या. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात आणि नगरसेवकांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्‍न मार्गी लावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले.

शहर स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडेही जगतापांनी सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कचरा उचलणे व साफसफाईचे काम तसेच धूर फवारणीचे काम प्रभावीपणे होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेला महत्त्व का दिले जात नाही?, सर्वच नगरसेवकांकडे नागरिक दररोज तक्रारी घेऊन का जातात?, संबंधीत अधिकारी आणि ठेकेदार काय काम करतात?, पुरेशी यंत्रणा उपलब्ध असताना कचरा प्रश्‍न निर्माण का होतो?, नादुरूस्त होणाऱ्या घंटागाड्या तत्काळ दुरूस्त का होत नाहीत? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांचे प्रश्‍न सोडवावेत, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली.

आयुक्‍तांच्या अधिकाऱ्यांना सूचना…
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शहरातील राडारोडा उचलण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. सर्व क्षेत्रीय अध्यक्षांनी कचरा उचलण्याबाबत दिरंगाई होत असल्याची तक्रार केली. तसेच पाणीपुरवठा व आरोग्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी असल्याचे बैठकीत सांगितले. हॉटेल व मांस विक्री दुकानांमध्ये तयार होणारा कचरा गोळा करण्यासाठी कडक नियमावली करावी. बैठकीच्या शेवटी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनाची अमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्याच प्रमाणे शहराच्या संपूर्ण भागात नियमित धूर फवारणीसह सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दररोज सकाळी 10 च्या आत स्वच्छतेची खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)