महादेवाच्या जयघोषाने मुंगी घाट दुमदुमला

संत तेल्या भुत्याच्या कावडीकडून महत्त्वाचा टप्पा सर; श्रींस कऱ्हेच्या पवित्र जलाने जलाभिषेक

खळद – श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने आज चैत्र शुध्द्‌ द्वादशीला हरहर महादेवाच्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुगी घाट सर करीत पायी वारीने आणलेल्या क-हेच्या पवित्र जलाने निवृत्ती महाराज खळदकर यांच्या हस्ते स्वयंभू श्रींस धार (जलाभिषेक) घातली.

शंभु महादेवाची यात्रा येथे दरवर्षी चैत्र शुध्द्‌ प्रतिपदा पासुन सुरू होते. यात्रा उत्सव काळात पंचमीला हाळदी, अष्टमीला ध्वज चढवीने व रात्री शिवपार्वतीचा विवाह सोहळा, यानंतर चैत्र शुध्द्‌ द्वादशी या दिवशी महाराष्ट्रातून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडी श्रींस जलाभिषेक (धार)घालण्याची परंपरा आहे. याच परंपरेतुन आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला.

परंपरेनुसार यात्रेसाठी रामनवमीला प्रस्थानानंतर कावड कोळविहीरे, जोगवडी, मेहता फार्म, वडगाव कॅनॉल, जिंती, फलटण, निंबाळकर नाका असा तीन दिवसांचा प्रवास करीत आज (दि. 28) पहाटे रणखिळा येथे पोहोचली. येथे मानाची सवईची हालगी, गुणावरे वाटाड्याच्या कावडीचा सहभाग करीत कोथळेत सर्व लवाजम्यासह विसाव्यासाठी थांबली. यावेळी कावडी सोबत पायीवारीत न आलेले पंचक्रोशीतील हजारो भाविकही येथे दाखल झाले. येथे पंचक्रोशीतील भाविकांच्यावतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला.
कोथळे येथे प्रशासनाच्या वतीने अनेक मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी नानासाहेब तेली महाराज (इस्लामपूर) यांच्यासह लहान मोठ्या काठ्या कावडी, शिर्सुफळ, शेटफळगडे, सणसर, माळेगाव, काटेवाडी, शिवभक्त मंडळी गोडाळा, रामहरिकृष्ण व्यवहारे, दगडू चव्हाण, ढेकळेवाडी कावडींच्या भेटी झाल्या. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान भव्य मिरवणुकीने कावडीने येथुन मुंगी घाटाच्या दिशेने प्रस्थान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कावड मुंगी घाट पायथ्याला आली, तेथे महाआरती करीत शंभोच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावर कावडीची अवघड अशी मुगी घाटाची चढण सुरू झाली.

यावेळी नभात ऊन सावलीचा खेळ यात पुढे कऱ्हा जलासोबत निवृत्तीमहाराज खळदकर व मागे वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्‍यावर बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. यावेळी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक डोंगर माथ्यावर गर्दी करून बसले होते, येथुन घाटातील माणसे अगदी मुगीसारखी दिसत असल्याचा प्रत्यय येत होता.

सायंकाळी 6:40 वाजता एक एक टप्पा पार करीत कावड घाट माथ्यावर आली. येथे पोलिस व प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी घाट माथ्यावर साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंधल, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, निरा बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब कामथे, जि.प.सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज हांडे, शंभूमहाराज भांडारगृह मठसंस्थांनचे मठाधिपती सिध्द्‌लिंग शिवाचार्य महाराज, सरपंच अभय मेनकुदळे, ग्रामविकास अधिकारी आर.सी.साळुंखे, उपसरपंच शंकर तांबवे, देविदास कामथे, कैलास कामथे, रामभाऊ झुरंगे, वर्षा कामथे, चंद्रकांत फुले, रविंद्र फुले, रमेश बोरावके, अमोल कामठे, लक्ष्मी धिवार यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.
यानंतर कावड वाजत गाजत येथील अमृतेश्वर मंदीरात नेण्यात आली तेथे अभिषेक, जलाभिषेक करण्यात आला व नंतर कावड मुख्य मंदीरात नेण्यात आली तेथे भाविकांचे दर्शन झाले व कावडीचे मानकरी संत निवृत्तीमहाराज खळदकर यांनी कावडीसोबत आणलेल्या कऱ्हेच्या पवित्र जलाने स्वयंभू श्रींस जलाभिषेक केला. येथे शंभु महादेव देवस्थान यांचे हस्ते कावडीची पुजा व कावडीस मानाचा ध्वज देण्यात आला व नंतर उमाओटयावर दोन दिवसाच्या मुक्कामासाठी नण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)