महात्मा फुलेनगर वस्ती आजारांच्या विळख्यात

दापोडी – येथील महात्मा फुलेनगर वस्ती सांडपाण्याच्या दुर्गंधीसह आजारांच्या विळख्यात अडकली आहे. या भागात चेंबरच्या तुंबलेल्या पाण्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार वाढले आहेत. जवळच नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीचीही त्यात भर पडली आहे.

या भागात एकूण 525 कुटुंबे राहतात. या कुटुंबांची मिळून या वस्तीत एक हजार लोकसंख्या आहे. या भागात गरीब कुटुंब राहत असल्याने त्यांच्याकडे उपचाराला देखील पैसे उपलब्ध नाहीत. स्थानिक रहिवाशांनी पालिकेला तक्रार केल्यास तात्पुरती उपाययोजना करून पालिका प्रशासन या भागातील नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. या भागातील नागरिकांना प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू, व्हायरल फ्लू, खोकला सारख्या साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. या भागातील महिला अस्वच्छ वातावरणामुळे साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. येथील रहिवासी मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करतात.

या वस्तीतील दुर्गंधी व आजाराचा विळखा असे दृश्‍य पाहता स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. एकतर या वस्तीत अपुरी जागा त्यात दुरुस्ती केलेल्या सामानाची अडगळ यामुळे या वस्तीचा अक्षरशा श्वास कोंडल्याचे पहायला मिळत आहे. तिन्ही ऋतुमध्ये सभोवतालची अस्वच्छता आपली मुले वारंवार आजारी पडतात. महापालिकेकडे सतत तक्रार करूनही या समस्येचा निपटारा होत नसल्याचे येथील रहिवासी एकनाथ कांबळे यांनी सांगितले. तर आजारांची मूळ समस्या जुनाट व तुंबलेल्या चेंबरमध्ये आहे. चेंबरचे कॉंक्रिट फोडून दुरुस्त करावे, अशी मागणी रहिवासी अनिकेत महाडिक यांनी केली. तर पालिका प्रशासनासोबतच येथील रहिवाशांनी सुद्धा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे या ठिकाणी सांडपाणी साचून न साथीचे आजार होणार नाहीत, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते रमेश राऊळ यांनी व्यक्त केली.

या भागातील ड्रेनेज लाईन जुनी व कमी क्षमतेची आहे. त्यामुळे वारंवार ही समस्या उद्‌भवते. आमच्याकडे कामगार कमी असून देखील आम्ही कामात कोणतीही कसूर करत नाही. परंतु येथील नागरिकांची मानसिकता बदलायला हवी. घर व अंगण स्वच्छ ठेवले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून ड्रेनेजमध्ये घुशी होणार नाही. डासोत्पत्ती होवू नये याचीही नागरिकांनी काळजी घेणे अपेक्षित आहे.
– दयानंद कांबळे, साफसफाई ठेकेदार, महापालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)