महात्मा गांधी जयंती निमित्त साताऱ्यात सद्दभावना फेरी

स्वच्छता आणि अहिंसेची घेतली शपथ

सातारा – महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपालिका व परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून सद्‌भावना फेरी काढण्यात आली. मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून फेरीस प्रारंभ झाला. फेरीत शहरातील विद्यार्थी, नागरिक,कार्यकर्ते, प्राध्यापक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी शंकर गोरे आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सद्‌भावना फेरीस सुरुवात झाली. प्रारंभी परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे समन्वयक विजय मांडके यांनी महात्मा गांधी यांची स्वच्छतेची आणि त्यांच्या अहिंसेच्या विचाराची शपथ उपस्थितांना दिली. दरम्यान, फेरीच्या अग्रभागी सातारा येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल मोहिते महात्मा गांधी यांच्या वेशात होते.

फेरीमध्ये मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, सुकुमार मंडपे, श्‍यामाप्रसाद बेगमपुरे, डॉ. राजेंद्र कांदळगावकर, मिनाज सय्यद, कॉ. वसंतराव नलावडे, उदय चव्हाण, प्रशांत पोतदार, शाहीर सचिन माळी, शाहीर शीतल साठे, डॉ. राजश्री देशपांडे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. प्रसन्न दाभोलकर, रवींद्र भारती – झुटिंग, जयंत उथळे, कल्याण राक्षे, किशोर पंडित, नगरसेविका आशा पंडित, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, मिलिंद पवार, गौतम भोसले, प्रा. डॉ. भास्कर कदम, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, सलीम आत्तार, प्रा. भाई माने, प्रा. जीवन बोराटे, सुभाष जाजू, हेमा सोनी, श्रीकांत के. टी. यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

खादी ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन
साताऱ्यातील ऐतेहासिक गांधी मैदानावर दुपारच्या सुमारास गांधी विचार यात्रेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गांधीजींच्या विचारांचे पोस्टर्स प्रदर्शन, खादी आणि ग्रामोद्योगाच्या वस्तूंचे प्रदर्शन, डॉक्‍युमेंट्रीज आणि शांती व सद्भावनेचा जागर करणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. महात्मा गांधीजी यांच्यावर चित्रकारांनी डेमोही केला. त्यास सातारकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)