महात्मा गांधीच्या समता, शांतता, बंधुभावातूनच सामाजिक सलोखा शक्‍य -निखिल वागळे

  • मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यान माला

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – देशात समता, सामाजिक शांतता, प्रेम आणि बंधुभाव असेल, तरच सामाजिक सलोखा शक्‍य आहे. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची चूल पेटवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मंगळवार दि. 30 ला येथे व्यक्‍त केले.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफताना “सामाजिक सलोखा आणि आजचे वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उप नगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राजश्री म्हस्के उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात झाली. महात्मा गांधीजींच्या खुनापासून स्वतंत्र भारतातील सामाजिक सलोख्याला सुरूंग लावल्याचे सांगत वागळे म्हणाले, “अहिंसा, सत्याग्रह आणि प्रेमाचा संदेश देणारे गांधीजी पाश्‍चात्यांना अधिक कळले. भारताची ओळख महात्मा गांधीच्या नावाने जगभर आहे; मात्र आपल्याला ती नाही, ही खेदाची बाब आहे. गांधी विचारांचे मूळ शाहू-फुले-आंबेडकरांच्या तत्वज्ञानात आहे. जो या विचाराने पुढे गेला त्याची उन्नती झाली. आयुष्य बदलून टाकण्याचा विचार गांधी विचार आहे.

-Ads-

‘गांधीजींच्या खुनाचे समर्थन करणारांवर सडेतोड टीका करताना वागळे म्हणाले की, महात्मा गांधींचा खून हा ते खरे व सर्वात मोठे सनातनी हिंदू होते म्हणून करण्यात आला. बहुसंख्य हिंदू हे सहिष्णू आहेत, म्हणूनच भारत देश विविधता, विषमता असूनही टिकून राहिलाय. सनातन हिंदू धर्म ऋग्वेदावर आधारित असून त्याचा पाया सर्वधर्म समानतेचा आहे.
आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक विकास ही सनातनची धर्म कल्पना आहे. हिंदुत्ववाद हे राजकीय षड्‌यंत्र असून त्यांनीच खरे तर हिंदू धर्म बाटवला आहे. गांधीजीच्या खुनाचे हे खरे कारण आहे.

फाळणीमुळे सामाजिक दरी वाढली असली तरी महात्मा गांधींचा खून करून धर्मांध अतिरेक्‍यांनी देशातील सामाजिक सलोख्याला चूड लावली. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले सेक्‍युलर राजे होते. त्यांचे राज्य रयतेचे, शेतकऱ्यांचे आणि सर्व जाती-धर्माचे होते, हे सांगताना आजच्या राज्यकर्त्यांच्या धर्माधतेला त्यांनी मार्मिक चपराक लगावली. धर्म व जाती व्यवस्था, आर्थिक विषमता, लिंगभेद विसरून समता निर्माण झाल्याशिवाय सामाजिक सलोखा शक्‍य नसल्याचे त्यांनी इतिहासातील दाखले देऊन स्पष्ट केले. मनुस्मृती हा संकुचित विचारांचा प्रतिगामी ग्रंथ असून संविधान हा अन्य कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा अधिक श्रेष्ठ असल्याचे वागळे म्हणाले.

कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते वागळे यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यान मालेचे मुख्य संयोजक डॉ. एस. के. मलघे यांनी परिचय वाचन केले. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी आभार मानले.
उद्या व्याख्यान मालेच्या समारोपात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांचे व्याख्यान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)