महागाई आणि चालू खात्यावरील तूट आटोक्‍यात; पुरेसा परकीय चलनसाठा

जागतिक व्यापारयुद्धांमुळे अनेक वेगाने विकसित होणारे देश त्यांच्या चलनाचे अवमूल्यन होऊ देत आहेत. बरेच देश चलनाचा वापर शस्त्रासारखा करीत आहेत. त्यामुळे भारताने व्याजदर वाढवून किंवा परकीय चलन वापरून रुपयांचे मूल्य वाढविण्याची गरज नाही. जर व्याजदरात वाढ केली तर भांडवलाचा वापर कमी होऊन मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
संजीव संन्याल
प्रमुख सल्लागार, अर्थमंत्रालय

नवी दिल्ली: रुपयाच्या मूल्यात या वर्षात आतापर्यंत 13 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ज्या कारणामुळे ही घट होत आहे त्या बाबी फारशा आपल्या नियंत्रणात नाहीत. त्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी पुन्हा व्याजदर वाढीच्या शक्‍यतेवर विचार केला जावा अशा सूचना केल्या जात आहेत. मात्र, तसे करण्याची काही एक गरज नसल्याचे अर्थमंत्रालयाला वाटते.

अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव संन्याल यांनी सांगितले की, रुपयाचे मूल्य योग्य पातळीवर स्थिर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे पुरेसे पर्याय आहेत. त्यामुळे व्याजदरात वाढ करण्याची गरज नाही. ते म्हणाले की, या वेळी भारताकडे 400 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी आहे. त्याचबरोबर महागाई आणि तूट नियंत्रणात आहे. त्यामुळे रुपया घसरला तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही असे अनेकांनी सांगितले. ते म्हणाले की, तरीही रिझर्व्ह बॅंकेचे परिस्थितीकडे लक्ष आहे.

ते म्हणाले की, अमेरिकेने अनेक देशांच्या विरोधात व्यापारीयुद्ध सुरू केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या चलनाचा वापर हत्याराप्रमाणे करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या देशांनी या काळात त्यांच्या चलनाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होऊ दिले आहे. आपण मात्र विनाकारण रुपयाचे मूल्य वाढू देण्याची आणि व्याजदरात वाढ करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सूचित केले. ते म्हणाले की, जर व्याजदरात वाढ केली तर पुन्हा भांडवलाचा वापर कमी होऊन त्याचा उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. याअगोदर नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे भारताच्या उत्पादकतेवर परिणाम झाला होता. आता पुन्हा व्याजदरात वाढ केली तर पुन्हा उत्पादकतेवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने मुख्य काम महागाई कमी पातळीवर ठेवण्याचे आहे. सध्या किरकोळ आणि घाऊक महागाई ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी पातळीवर आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण समिती महागाई कमी पातळीवर असतानाही पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जागतिक बाजारातील परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागला तरी भारताकडे आपल्या आयातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परकीय चलन आहे. त्यामुळे रुपयाचे मुल्य उचित पातळीवर ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)