महसूल शंका समाधान

खरेदीदाराने फसवून किंवा इतर कामासाठी बरोबर नेऊन खरेदीदस्तावर सह्या घेतल्या आहेत, अशी तक्रार असल्यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्यावा?
या तक्रारीमध्येही सहसा खरेपणा नसतो. नोंदणीकृत दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालयातच होतो. दुय्यम निबंधक कार्यालयात आपण कोणत्या दस्तावर सही करीत आहोत, हे सही करणाऱ्या सर्वांना माहीत असते. शंका असल्यास दुय्यम निबंधक किंवा तेथील कर्मचाऱ्यास विचारता येऊ शकते. फसवणूक झाली असल्यास संबंधीताने फौजदारी स्वरूपाची तक्रार करणे गरजेचे असते. परंतु तसे न करता तक्रारदार महसूल अधिकाऱ्याकडे मुद्दाम तक्रार करतो. भारतीय पुरावा कायदा कलम 91 व 92 अन्वये नोंदणीकृत दस्ताच्या विरूध्द दिलेला तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही. दिवाणी न्यायालयाने दस्त बेकायदेशीर ठरविला नसेल किंवा दिवाणी न्यायालयाकडून दस्त रद्द करुन घेण्यात आला नसेल तर महसूल दफ्तरी अशा नोंदणीकृत दस्ताची नोंद करणे कायदेशीर ठरते.

तक्रार केस चालू असताना एखाद्या पक्षकाराने साक्षीदारांना हजर राहण्यासाठी मागणी केली तर कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 227, 228 व 229 अन्वये पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज सादर करण्यासाठी कोणालाही समन्स काढण्याचा व उपस्थित राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार अव्वल कारकून किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यास आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“जमिनीचे वाटप झालेले नाही. खरेदी देणार याने सामाईक जमिनीतील क्षेत्र आमची परवानगी न घेता विकले आहे,’ अशी तक्रार असल्यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्यावा?
मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, कलम 44 अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिश्‍याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे खरेदी घेणाऱ्यास सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे अशी तक्रार फेटाळून लावावी व फेरफार प्रमाणित करावा.

व्यवहारातील काही हितसंबंधी व्यक्ती गावी राहत नसतील व त्यांचे पत्ते उपलब्ध होत नसतील तर काय करावे?
मूळ दस्तावरुन व ज्याचे नाव या नोंदीमुळे लागणार आहे त्याच्याकडून हितसंबंधीतांचे पत्ते घ्यावेत व नोटीस बजवावी. हक्क नोंदणीची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कागदपत्रे व माहिती पुरविण्याची पूर्ण जबाबदारी आहे. हितसंबंधी व्यक्ती गावी राहत नसतील तर संबंधीत इसमाच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर, त्याच्या घरातील सज्ञान व्यक्तीकडे देऊन व त्याची पोहोच घेऊन नोटीस बजावता येते अथवा पंचनाम्याने, घराच्या मुख्यत: दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून (चिकटवून) बजावावी. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली, असे गृहीत धरले जाते. काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्द करून जाहीर नोटीस बजावता येते.

‘जुडी’ आणि ‘नुकसान’ म्हाणजे काय?
वतन जमिनींसंबंधात शेतजमिनीसाठी आकारण्यांत येणाऱ्या ‘महसुलाच्या रकमेखाली ‘जुडी किंवा विशेष’ या प्रकारच्या रकमेचा उल्लेख असतो. इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसूलापैकी जो भाग सरकार जमा केला जातो त्याच भागाला ‘जुडी’ म्हणतात आणि इनामदाराने वसूल केलेल्या जमीन महसुलापैकी जो भाग इनामदार स्वत:कडे ठेवतो त्या भागाला ‘नुकसान’ म्हणतात.

सारा माफी म्हणजे काय?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 47, 78 इत्यादीन्वये, विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करण्याचा अधिकार शासनास आहे. अशी आकारणी माफ करणे म्हणजे सारा माफी.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोणती सात प्रकारची इनामे/वतने अस्तित्वात होती?
इनाम वर्ग-1 : सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाच्या मोबदला म्हणून दिलेली जमीन.
इनाम वर्ग-2 : जात इनाम – एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल दिलेली जमीन.
इनाम वर्ग-3 : देवस्थान इनाम- देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन.
इनाम वर्ग- 4 : देशपांडे/देशमुख/कुलकर्णी इनाम
इनाम वर्ग- 5 : परगाणा किंवा गावची जमाबंदी, हिशेब, वसूल, शासकीय कामकाज व व्यवस्था पाहणेच्या कामगिरीचा मोबदला म्हणून दिलेले इनाम
इनाम वर्ग 6-अ : रयत उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम
इनाम वर्ग 6-ब : सरकार उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम (महार, रामोशी)
इनाम वर्ग-7 (संकीर्ण इनाम) : सार्वजनिक कारणांसाठी सारा माफीने, कब्जेहक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी. इनाम जमिनी या सरंजाम व इनाम कायद्यातील तरतूदी व सनदेतील अटींना आधीन राहून उपभोगण्याचा हक्क होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)