महसूल शंका समाधान

स्थानिक चौकशी म्हाणजे काय?
वर्दी मिळाल्यानंतर, त्या वर्दीची खातरजमा करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्य प्रतिष्ठित व्याक्तींकडे करण्यात येणारी चौकशी म्हणजे स्थानिक चौकशी.

पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्यास ते तलाठी स्तरावर दुरुस्त करण्याची मागणी खातेदाराने केली असल्यास काय कार्यवाही अपेक्षित आहे?
अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद घालू नये. लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 155 अन्वये तहसीलदार यांचेकडे अर्ज करण्यास सांगावे.

कोणत्याही कायदेशीर दस्तावरून गाव नमुना सहामध्ये नोंद घेताना तलाठी यांनी काय खबरदारी घ्यावी?
कोणत्याही दस्तावरून गाव नमुना सहामध्ये नोंद घेताना, संबंधित मिळकतीबाबत झालेला जुना फेरफार जरूर बघावा. उदा. ‘अ’ने ‘क’ला मिळकत विकली. ‘क’ने नोंदीसाठी अर्ज केल्यारवर ‘अ’चे नाव सदर मिळकतीवर कोणत्या फेरफारने आले ते जरूर बघावे. यामुळे सदर मिळकत विकण्याचा हक्क फक्त ‘अ’ला होता की या व्यवहाराला इतरही सहधारकाच्या परवानगीची आवश्‍यकता होती ते समजेल. अशीच दक्षता इतर सर्व नोंदी (विशेषत: वारस नोंदी) करतांनाही घ्यावी.

एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत तलाठी यांच्याकडे हजर केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी? तसेच काय खबरदारी घ्यावी?
कोणताही हक्क धारण केल्याची माहिती कायदेशीरपणे प्राप्त झाल्यावर तलाठी यांनी त्याची नोंद गाव नमुना सहामध्ये करणे आवश्‍यक आहे.
तलाठी यांनी खरेदी घेणार किंवा खरेदी देणार यांनी समक्ष हजर केलेली नोंदणीकृत दस्ताची प्रत साक्षांकित असावी याची खात्री करावी.
कोणताही हक्क संपादन झाल्यावर तलाठ्यांना लेखी अथवा तोंडी कळविले जाते. याला ‘वर्दी’ म्हणतात. अशा वर्दीची पोहोच नमुना 7 मध्ये द्यायची असते.
सदर व्यवहाराची नोंद म.ज.म.अ.1966, कलम 150 (1) अन्वये गाव नमुना 6 मध्ये (हक्काचे पत्रक किंवा फेरफार रजिस्टर) करावी.
गाव नमुना सहामध्ये नोंद घेतल्यावर गाव नमुना सहाची एक प्रत गाव चावडीच्या नोटीस बोर्डवर लावणे आवश्‍यक आहे.
नोंदणीकृत दस्त/अ पत्रक/इंडेक्‍स-2 मध्ये तसेच खरेदी देणार याच्या 7/12 उताऱ्यावर नमूद सर्व हितसंबंधितांना नमुना 9 मध्ये, 15 दिवसाच्या मुदतीत समक्ष हजर राहण्याची सूचना देणारी नोटीस बजवावी.
या नोटीसीची एक प्रत म.ज.म.अ.1966, कलम 150 (2) अन्वये तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी.
नोटिसीनुसार सर्व हितसंबंधित हजर राहिल्यास त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घ्यावी. जमीन शेतीची आणि शेती क्षेत्रात असल्यास, खरेदी घेणार हे शेतकरी असल्याची पुराव्यासह खात्री करावी.
फेरफार नोंदीबाबत कोणी लेखी अथवा तोंडी आक्षेप/हरकत घेतल्यास त्यास द्यावयाची पोहोच मि.ज.म.अ.1966, कलम 150 (3) अन्वये नमुना 10 मध्ये द्यायची असते आणि हरकतीची नोंद विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवहीत (गाव नमुना सहा-अ मध्ये) करावी.विवादास्पद नोंदीवर निर्णय घेण्याचे अधिकार म.ज.म.अ. 1966, कलम 150 (6)अन्वये अव्वल कारकूनच्या हुद्यापेक्षा कमी नाही अशा महसुली किंवा भूमापन अधिकाऱ्यांना आहेत.
संबंधित नोंदीवर घेतल्या गेलेल्या हरकतीची माहिती मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांना द्यावी.
संबंधित नोंदीवर निर्णय घेण्यासाठी प्रमाणन अधिकाऱ्यांच्या भेटीची सूचना नमुना 11 मध्ये तलाठ्यास प्राप्ती होते.
फेरफार नोंदीबाबत निर्णय घेण्यासाठी मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांच्या भेटीची सूचना नमुना 11 मध्ये प्राप्त झाल्यानंतर, तलाठ्याने त्या नोंदीशी संबंधित सर्व हितसंबंधितांना सुनावणीसाठी हजर राहण्याठी नोटीस नमुना 12 मध्येत बजवायची असते.
प्रमाणन अधिकाऱ्यांनी विवादास्पद प्रकरणे म.ज.म.अ.1966, कलम 150 (4) अन्वये शक्‍यतो एका वर्षाच्या आत निकालात काढावी.
गाव नमुना सहामधील कोणतीही नोंद सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणीत केल्याशिवाय त्याची नोंद अधिकार अभिलेखात करता येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)