महसूल शंका समाधान

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसांना वारस दाखला (Legal Heir Certificate) देण्याचे अधिकार कोणाला आहेत?
महाराष्ट्र ट्रेझरी नियम, 1968, नियम 359 अन्वये, फक्त मयत शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसांना आवश्‍यकता असल्यास, मयताच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी इत्यादींची रक्कम मिळणेकामी, वारसांमध्ये कोणताही वाद नसेल तर, तहसीलदारांना वारस दाखला देण्याचा अधिकार आहे. असा दाखला प्रदान करण्यापूर्वी तहसीलदारांनी संक्षिप्त चौकशी करणे आवश्‍यक आहे. हा दाखला फक्त उपरोक्त कारणांसाठीच वापरता येतो. अन्य कोणत्याही कारणांसाठी नाही.

उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate) देण्याचे अधिकार कोणाला आहेत?
उत्तराधिकार म्हणजे अशी प्रक्रिया, ज्यामुळे मृत्युपत्र करणाऱ्याच्या इच्छेनुसार (testator’s will) किंवा मृत्युपत्र न करता मयत झालेल्या (intestacy) व्यक्तीची मालमत्ता मिळण्यास लाभार्थी पात्र ठरतात. भारतीय उत्तराधिकार अधिनियम, 1925 च्या कलम 370 अन्वये उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्थांवर मालमत्तेबाबत वारसांमध्ये वाद असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्‍यक असते. असे प्रमाणपत्र प्रदान करण्यापूर्वी न्यायालयातर्फे दोन्ही पक्षांना त्याची बाजू आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विनामृत्युपत्र मयत हिंदू स्त्रिची मालमत्ता कशी प्रक्रांत (हस्तांतरित) होईल?
हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956, कलम 15 अन्वये विनामृत्युपत्र मयत झालेली हिंदू स्त्री खातेदाराची संपत्ती पुढीलप्रमाणे वारसाहक्काने जाईल.
अ) पहिल्यांदा, मुलगे व मुली (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे
आ) दुसऱ्यांदा, पतीच्या वारसाकडे
इ) तिसऱ्यांदा, मृत स्त्रीची माता आणि पिता यांच्याकडे
ई) चवथ्यांदा, पित्याच्या वारसाकडे आणि शेवटी
उ) मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होईल.
तथापि, हिंदू स्त्री जर विनामृत्युपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्त्रीच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल आणि हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासऱ्याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास, मृत स्त्रीच्या पतीच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.

हिंदू उत्तराधिकार कायद्यान्वये उत्तराधिकाराचा क्रम कसा असतो?
हिंदू उत्तराधिकार अधिनियम1956, कलम 9 अन्वये उत्तराधिकाराचा क्रम असा असेल:
वर्ग एकमध्ये समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि वर्ग दोन, तीन आणि चारचे वारस वर्जित होतील. तसेच वर्ग एकच्या वारसांअभावी वर्ग दोनच्या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्हा वर्ग दोनच्याच पहिल्या नोंदीत येणाऱ्या (वडील) वारसांना, दुसऱ्या नोंदीतील वारसांपेक्षा (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण) प्राधान्य मिळेल. याप्रमाणे पुढे उतराधिकारी नोंदता येतील.

हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?
होय, हक्ककसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्‍यक आहे अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र म्हणजे दान/बक्षीस पत्र. हक्कसोडपत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, 1882 कलम 123 अन्वये असे दान/बक्षीसद्वारे झालेले हस्तांतरण नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्‍यक असते. नोंदणी अधिनियम 1908, कलम 17 अन्वये स्थावर मालमत्तेचे दान लेख यांची नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)