महसूल शंका समाधान

लोकसेवकाने कायदेशीररित्या दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे हा गुन्हा आहे काय?
होय. लोकसेवकाने कायदेशीररित्या दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे हा भारतीय दंड विधान, कलम 188 अन्वये दखलपात्र (Cognizable), जामीनपात्र (Bailable), आपसात न मिटवण्याजोगा (Compoundable) अपराध आहे. कायदेशीररित्या पारित केलेल्या आदेशाची अवज्ञा केली गेली तर तसा आदेश पारित करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा त्या आदेशाची अंमलबजावणी ज्या दुय्यम अधिकाऱ्याकडे/कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात आली असेल त्याने, संबंधीत पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करणे आवश्‍यक असते.

सर्व्हे नंबर (स.न.), भूमापन क्रमांक (भू.क्र.) भूमापन क्रमांकाची या संज्ञांमध्ये काय फरक आहे?
सन 1910 दरम्यान बंदोबस्त, योजनेदरम्यान तयार केलेल्या नकाशातील शेताच्या दर्शक क्रमांकास सर्व्हे नंबर (नागपूर भागात खसरा क्रमांक) असे म्हणतात. पुनर्मोजणी योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकास भूमापन क्रमांक असे म्हणतात. ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966, कलम 2(37) मध्ये भूमापन क्रमांकची व्याख्या नमूद आहे. एकत्रीकरण योजनेमधील शेताच्या दर्शक क्रमांकास गट नंबर असे म्हणतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल्पभूधारक शेतकरी, लहान शेतकरी, दुर्बल घटक, दारिद्य्ररेषेखालील व्यक्‍ती, भूमिहीन व्यक्‍ती, शेतकरी व शेतमजूर यांच्या व्याख्या काय आहेत?
अल्प-भूधारक शेतकरी : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम 16-ब नुसार जो शेतकरी मालक व/ किंवा कुळ म्हणून एक हेक्‍टरपर्यंत (2.5 एकर) शेतजमीन वहिवाटतो.
लहान शेतकरी : म्हणजे जो शेतकरी मालक व/किंवा कुळ म्हणून एक हेक्‍टर (2.5 एकर) पेक्षा जास्त शेतजमीन वहिवाटतो.
दुर्बल घटक : दोन हेक्‍टरपेक्षा जास्त नाही अशी कोरडवाहू जमीन धारण करणारा (दुष्काळप्रवण म्हणून जाहीर क्षेत्रात 3 हेक्‍टर) क्षेत्रात लहान शेतकरी आणि ज्याचे बिगरशेती वार्षिक उत्पन्न रु. 13,500/- पेक्षा जास्त नाही
शेतमजूर : अशी व्यक्‍ती जी कोणत्याही प्रकारची शेतजमीन धारण करत नाही आणि कसत नाही; परंतु राहते घर धारण करते आणि तिचे एकूण 50% उत्पन्न शेतमजुरीपासून मिळते.
दारिद्य्ररेषेखालील व्यक्‍ती : ज्यांचे पैसा अथवा माल किंवा अंशत: पैसा आणि अंशत: माल अशा सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु. 20,000/- पेक्षा आणि शहरी भागात रु. 25,200/- पेक्षा जास्त नाही.
भूमिहीन व्यक्‍ती: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम 9-अ नुसार शेतीच्यार प्रयोजनासाठी मालक म्हणून किंवा कुळ म्हणून कोणत्याही प्रकारची शेतजमीन धारण केलेली नाही व जी मुख्यत: अंगमेहनतीने आपली उपजीविका करते आणि जिचा शेतीचा व्यवसाय करण्याचा हेतू आहे व ती जमीन कसण्यास समर्थ आहे.
शेतकरी : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम 2(2) अनुसार व्यक्‍तिश: जमीन कसणारी व्यक्‍ती म्हणजे शेतकरी.

तहसीलदारांना कोणत्या कायद्याने शपथ देण्याचा अधिकार आहे?
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973, कलम 297(1) अन्वये कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तहसिलदार यांना शपथ देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर शपथपत्र करता येते. शपथपत्रात शपथ घेतल्याविषयीचा उल्लेख नसेल तर असे शपथपत्र कायदेशीर ठरत नाही. महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक 01/02/2011 तसेच शासन परिपत्रक दिनांक 21/09/2009 अन्वये नायब तहसीलदार आणि अव्वल कारकून यांना शपथपत्राबाबत शपथ देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र करणे हा भारतीय दंड संहिता कलम 191 अन्वये गंभीर गुन्हा असून असे कृत्य भारतीय दंड संहिता कलम 193, व 199 अन्वये शिक्षेस पात्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)