महसूल शंका समाधान

देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल असू शकते काय?
होय, देवस्थान इनाम जमीनीत कुळाचे नाव दाखल असू शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टरने कुळ वहिवाट अधिनियम कलम 88 ची सूट घेतली असेल तर अशा कुळास, कुळ वहिवाट अधिनियम 32 ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार प्राप्ते होत नाही.

देवस्थान इनाम जमिनीच्या 7/12 सदरी भोगवटादार आणि वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव कशा पद्धतीने लिहावे?
देवस्थान इनाम जमिनीच्या 7/12 च्या कब्जेदार सदरी भोगवटादार (मालक) म्हणून फक्त देवाचे/देवस्थानचे नाव लिहावे. काही ठिकाणी कब्जेदार सदरी भोगवटादार (मालक) या नावाखाली रेष ओढून वहिवाटदार/व्यसवस्थापकाचे नाव लिहिण्याची प्रथा आहे. परंतु या प्रथेमुळे कालांतराने, 7/12 चे पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्दाम लिहिले जात नाही. त्यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात. त्याचमुळे व्यवस्थावपक/वहिवाटदार यांची नावे 7/12 च्या इतर हक्कातच लिहावीत.

देवस्थान इनाम जमिनीला वारसांची नावे दाखल केली जाऊ शकतात काय?
देवस्थान इनाम जमिनीला वारसांची नावे दाखल केली जाऊ शकतात. तथापि, येथे जन्मून वारस ठरण्याऐवजी प्रत्यक्ष पूजा-अर्चा करणारा वारस ठरतो. म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्व येथे लागू होते. एखाद्या मयत पुजाऱ्याला चार मुले वारस असतील तर पूजा-अर्चा व वहिवाटीसाठी पाळी पद्धत ठरवून द्यावी, असे अनेक न्यायालयीन निर्णयात म्हटले आहे. मठाचा प्रमुख/पुजारी, अविवाहीत असला किंवा त्याला वारस नसल्यास तो त्याच्या मृत्यु आधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊन जातो. परंतु या जमिनीचे वारसांमध्ये वाटप होत नाही. तसेच एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे
हस्तांतरण होत नाही.

एका मयत खातेदाराची दोन लग्नं झाली होती. दोन्ही बायकांना त्याच्यापासून झालेली मुले आहेत. आता वारस दाखल करण्यासाठी अर्ज आला आहे. अशा वेळेस कोणाचे नाव वारस म्हणून दाखल करावे? अनौरस संततीला वडिलांच्या मिळकतीमध्ये वारसाहक्‍क मिळतो काय?
हिंदू विवाह कायदा 1955, कलम 5 मध्ये विवाहासाठी ज्या शर्ती आहेत त्या अन्वये विवाहाच्या प्रसंगी वर आणि वधूपैकी कोणीही मनोविकल, मानसिक रुग्ण, भ्रमिष्ट, अपस्माराचे झटके येणारा, वयाने अज्ञान, निषिध्द नातेसंबंधी नसावा. कलम 17 व 18 अन्वये, विवाहाच्या प्रसंगी वराची पत्नी आणि वधुचा पती हयात (जिवंत) नसावा.

भारतीय दंड संहिता 1860, कलम 494 हा गुन्हा आहे. (कायदेशीर घटस्फोट झाला असेल तरच अपवाद). बेकायदेशीरपणे लग्न झालेल्या दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या मिळकतीत हक्‍क येत नाही. (एआयआर 2002, गोहत्ती 1996) दुसरे लग्न अवैध असल्यामुळे आणि दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या मिळकतीत हक्‍क येत नसल्यामुळे तिचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

तथापि, हिंदू विवाह कायदा, कलम 16(3) अन्वये अनौरस संततीला वडिलांच्या स्वकष्टार्जित तसेच वंशपरंपरागत संपत्तीमध्ये वारसाहक्‍क आहे. (सर्वोच्च न्यायालय, रेवणसिदप्पा वि. मल्लिकार्जुन-31/3/2011). त्यामुळे वर नमुद प्रकरणांमध्ये मयताचा वारस ठराव, मयताची पहिली पत्नी व मुले/मुली तसेच दुसऱ्या पत्नीची सर्व अपत्ये यांचे नावे नोंदवावा. स्थानिक चौकशी करावी. वारस ठराव मंजूर करून त्याचा फेरफार नोंदवावा. नोटीस बजावल्यानंतर जर दुसऱ्या पत्नीने हरकत नोंदवली तर मंडल अधिकाऱ्यांनी तक्रार केसची सुनावणी घ्यावी.

सर्वांचे म्हणणे नोंदवावे. व वरील तरतुदी नमूद करून निकाल द्यावा. जरूर तर दुसऱ्या पत्नीला दिवाणी न्यायालयातून तिचा वारस हक्‍क सिद्ध करून आणण्यास सांगावा. वारस ठराव/फेरफार नोंद नोंदविण्याआधीच सर्वांनाच दिवाणी न्यायालयातून वारस हक्‍क सिद्ध करून आणण्याचा सल्ला देऊ नये. कायद्यात नमूद तरतुदींचे पालन करून काम करणे हे आपले कर्तव्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)