महसूल शंका समाधान

नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल खात्याची जबाबदारी काय असते?
समाधान : नैसर्गिक आपत्तीच्या काळात, आपत्तीग्रस्तांना सर्व मदत देण्यात महसूल खात्यातील जिल्हाधिकारी ते कोतवाल यांचा सक्रिय सहभाग असतो. या काळात महसूल विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी खालील कामे करणे आवश्‍यक आहे.

आपत्तीपूर्व नियोजन
1. आपआपल्या विभागावर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासाठी नियोजन करणे.
2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा/तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा/गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे.
3. आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचे आवश्‍यक तेव्हा अद्यावतीकरण करणे.
4. आपल्या विभागातील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे. तसेच आपली संपर्क यंत्रणा बिघडण्याचा संभव गृहित धरून त्यासाठी पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे.
5. आपआपल्या क्षेत्रात आपत्तीच्या काळात लोकांना हलवण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करून ठेवणे.
6. नियंत्रण कक्षाची तपशीलवार व्यवस्था करणे आणि नियंत्रण कक्ष 247 मध्ये सुरू ठेवणे.
7. मदत आणि सोडवणूक कार्यासाठी आवश्‍यक असणारे सर्व साहित्य जमा करून ठेवणे. उदा. मेणबत्ती, बॅटरी, लाईफ जाकेट, रबरी टयूब, पेट्रोमॅक्‍स, दोर, सर्च लाईट, विविध करवती, मेगाफोन, पोहणाऱ्या व्यक्तींची यादी (फोन नं. सहीत) इत्यादी.
8. आपत्तीच्या काळात आवश्‍यक अशा जड संसाधनाची उपलब्धता, ते आपल्या परिसरात कोठे आहे याची यादी करून ठेवणे. उदा. जे.सी.बी, पोकलन, ट्रक, बोटी, जनरेटर इत्यादी.
9. जिल्हा/तालुका/गावांचे अद्ययावत नकाशे नियंत्रक कक्षेत ठेवणे.
10. स्वयंसेवी संस्था आणि त्याचे सदस्य यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनीय भागात लावणे.
11. आपल्या विभागातील माहिती संबंधित वेबसाईटवर अद्ययावत करण्यासाठी उपलब्ध करून देणे.
12. आपल्या विभागातील प्रशिक्षित गटाच्या नियमित संपर्कात राहून रंगीत तालीमचे आयोजन करणे.

आपत्तीची सूचना मिळताच करावयाची कार्यवाही
1. आपत्तीची सूचना मिळताच गाव, तालुका पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देणे.
2. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तयार केलेल्या गटांनी नियोजनानुसार कार्य करण्यास सुरुवात करणे. उदा. मदत व सोडवणूक गट, प्रथमोपचार गट इत्यादी.
3. आपत्तीची खात्री करून जिल्हा नियंत्रण कक्षास व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे.

प्रत्यक्ष आपत्तीच्या काळात
1. अग्निशमन दलाच्या मदतीने आपत्तीत अडकलेल्या लोकांची सोडवणूक करणे.
2. जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी प्राधान्याने वाहनांची व्यवस्था करणे
3. मृत व्यक्‍ती आणि जनावरांना हलविण्याची व्यवस्था करणे. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस, शासकीय वाहने आणि खाजगी वाहनाचा वापर केला जातो.
4. अतिसंवेदनशील भागात लाउडस्पीकर असलेल्या वाहनावरून दक्षतेचा इशारा देणे.
5. जनजीवन सुरळीतपणे सुरू होण्यासाठी दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे.
6. अडकलेल्या लोकांची सोडवणूक करून त्यांचे स्थलांतर करणे
7. आपत्तीग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करणे.
8. महसूल यंत्रणेमार्फत, आरोग्य विभागाच्या मदतीने साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी उपाययोजना करणे.
9. अन्न, पाणी यांचे निरीक्षण करूनच त्याचे वितरण करणे.
10. कपडे, शिधा (सुके धान्य) यांचे वाटप करणे तसेच स्वयंपाकासाठी आवश्‍यक वस्तूंची उपलब्धता करणे.
11. सानुग्रह अनुदानाचे वाटप करणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)