महसूल शंका समाधान

सात-बारा सदरी इतर हक्कात ‘तुकडा’ अशी नोंद काय दर्शविते?
जमिनींचे एकत्रीकरण आणि तुकडेजोड-तुकडेबंदी अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेली जमीन म्हणजे तुकडा.

अ’ व्यक्तीने ‘ब’ व्यक्तीस त्याच्या तीन एकर जमिनीपैकी एक एकर जमीन 2013 साली नोंदणीकृत खरेदीखताने विकली, त्याची नोंद गाव दप्तवरी करायची राहून गेली. ‘अ’ ने 2014 साली ‘क’ या व्यक्तीला संपूर्ण तीन एकर जमीन नोंदणीकृत खरेदीखताने विकली, त्याचीही नोंद गाव दप्तरी करायची राहून गेली. 2016 साली ‘अ’ ने व त्याच्या पत्नीेने दिवाणी न्यायालयात आपसात तडजोड करून 40 आर जमीन ‘अ’ च्या नावे, तर 80 आर जमीन त्याच्या अज्ञान मुलाच्या नावे केली. न्यायालयाने तसा आदेश पारित केला. तो आदेश तलाठ्याकडे नोंदीसाठी आला आहे. काय करावे?
“अ’ ने जेव्हा “ब’ यास त्याच्या तीन एकर जमिनीपैकी एक एकर जमीन 2013 साली नोंदणीकृत खरेदीखताने विकली तेव्हाच त्याचा त्या एक एकर जमिनीवरील अधिकार संपला. तो फक्त दोन एकर जमिनीचा मालक आहे. त्यामुळे 2014 साली संपूर्ण तीन एकर जमीन नोंदणीकृत खरेदीखताने “क’ ला विकण्याचा “अ’ ला अधिकार नाही. तो फक्त दोन एकर जमीन विकू शकतो आणि “क’ ची खरेदी नोंद फक्त दोन एकर पुरतीच मंजूर होईल. याचा अर्थ आज रोजी “अ’ च्या नावे जमीन नाही. न्यायालयात त्याने, त्याच्या नावे जमीन असल्याचा खोटा पुरावा सादर केला आहे. न्यायालयास ही बाब कळवावी व आदेश रद्द करून घ्यावा. “ब’ आणि “क’ ला “अ’ ने केलेली विक्री न्यायालयीन आदेशापूर्वीचे असल्याने, “ब’ च्या. नावे एक एकर तर आणि “क’ च्या नावे दोन एकर क्षेत्र नोंदणीकृत खरेदीखतानुसार नोंदवावे.

भोगवटादार वर्ग 2 याला त्याची जमीन गहाण ठेऊन बॅंकेकडून कर्ज घेता येईल काय?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 36(4) मध्ये नमूद आहे की, म.ज.म.अ. कलम 36, पोट-कलम (1) मध्ये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, भोगवटादार वर्ग दोन याने भूमी सुधारणा कर्ज अधिनियम, 1883, शेतकऱ्यांना कर्जे देण्याबाबत अधिनियम, 1884 किंवा मुंबईचा बिगर शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत अधिनियम, 1928 या अन्वये राज्य शासनाने त्यास दिलेल्या कर्जाबद्दल राज्य शासनाच्या नावाने किंवा सहकारी संस्थेने किंवा (भारतीय स्टेट बॅंकेबाबत अधिनियम, 1955 च्या कलम 3 अन्वये प्रस्थापित केलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने किंवा बॅंकांचा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांबाबत (उपक्रम संपादन करणे आणि हस्तांतरण) अधिनियम, 1970, याचे कलम 2, खंड (ड) च्या अर्थानुसार, तत्सम नवीन बॅंकेने किंवा संबंधित कायद्यान्वये प्रस्थापित केलेल्या महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाने, त्यास दिलेल्या कर्जाबद्दल उक्त सहकारी संस्थेच्या नावाने भारतीय स्टेट बॅंक, तत्सम नवीन बॅंक किंवा यथास्थिती, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ याच्या नावाने आपली मालमत्ता गहाण ठेवणे हे कायदेशीर असेल.

हिंदू वारसा अधिनियम, 2005 अन्वये वारसा कायदा 1956 नेमकी काय दुरुस्ती करण्यात आली?
1956 च्या वारसा कायद्यानुसार एखाद्या कुटुंबातील वडिलोपार्जित मिळकतीत मुलीला वडिलांच्या पश्‍चात फक्त त्यांच्या हिश्‍श्‍यामधील वारसा हक्काने मिळणारा हिस्सा प्राप्त होत असे, तर मुलांना वडिलांच्या पश्‍चात त्यांच्या हिश्‍श्‍यामधील वारसा हक्काने मिळणारा हिस्सा अधिक जन्मतःच सहहिस्सेदार म्हणून प्राप्त होणारा हिस्सा असा दुहेरी हिस्सा प्राप्त होत असे. ही तफावत दूर व्हावी या दृष्टीने हिंदू वारसा अधिनियम, 2005 च्या कलम 6 मध्ये दुरुस्ती करणेत आली की, “9 सप्टेंबर 2005 पूर्वी जन्मलेल्या मुलींना तसेच दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क असेल.’ याचा मुख्य उद्देश असा की मुलींना देखील त्यांच्या माहेरच्या अथवा वडिलांकडील वडिलोपार्जित मिळकतीत जन्मतःच सहहिस्सेदार म्हणून मानले जाईल व मुलाप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीमधील सर्व अधिकार व जबाबदाऱ्या 6 मुलींना देखील प्राप्त करून देण्यात याव्यात. मा. सर्वोच्च न्यायालयाने, दिनांक 16/10/2015 रोजी, दिवाणी अपील क्र. 7217/2013 (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर) या खटल्यात असा निर्णय केला की, वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मलेली असो.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)