महत्त्व स्वशिक्षणाचे

स्व-शिक्षण म्हणजे अधिक अभ्यास करणे किंवा जादा क्‍लासेसला हजेरी लावणे असे नव्हे. स्व-शिक्षणाचा अनुभव हा एखाद्या नवीन वर्गाला उपस्थिती दर्शविणे, नव्याने जिम्नॅशियम सुरू करणे किंवा एखाद्या परिषदेला प्रथमच हजेरी लावण्यासारखे आहे. स्व-शिक्षण हे कधी कधी औपचारिक किंवा अनौपाचरिक शिक्षणाचा भाग असतो. आपण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही बाबी शिकत असतो. त्या बाबी आत्मसात करणे किंवा त्याचे चिंतन करणे म्हणजे स्व-शिक्षण होय, असे ढोबळ अर्थाने म्हणता येईल.

विविध सामाजिक कार्यशाळेला हजेरी लावणे, मोफत ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे, ग्रंथालयातील पुस्तक चाळणे, स्कॉलरशिप किंवा अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करणे, स्वत:साठी मार्गदर्शक शोधणे यातून स्व-शिक्षणाचे कौशल्य विकसित करू शकतो. आपल्या जीवनमानाचा दर्जा हा आपण वेळेचा सदुपयोग कसा करतो, यावर अवलंबून असते. काही मंडळी पैसा जमवण्यासाठी वेळ देतात तर काही जण विविध उपक्रमात सहभागी होऊन वेळेचा उपयोग करतो. मात्र स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी वेळ देणे ही बाब सर्वात फायद्याची आणि उपयुक्त ठरू शकते. स्व-शिक्षण हा त्याचाच एक भाग होय. स्व-शिक्षणाचे फायदे पुढीलप्रमाणे नमूद करता येतील.

सुसंगत राखण्यास हातभार-  बदलत्या जगात स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला कायम अपडेट राहणे अनिवार्य बनले आहे. काळाबरोबर चालणारा टिकून राहतो, असे म्हटलं जाते आणि ते खरेही आहे. कालबाह्य व्यक्ती स्पर्धेच्या बाहेर फेकल्या जातात; परंतु स्व-शिक्षणामुळे कालसुसंगत राहण्यास हातभार लागतो. बदलते ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती याबाबत अपडेट देण्याचे कार्य स्व-शिक्षणाच्या माध्यमातून होत राहते.

आत्मविश्‍वासाला बळ: स्व-शिक्षणामुळे कौशल्य विकास होतो. नवनवीन तंत्र, कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात केल्याने आपल्या कामातील अचूकता वाढीस लागते. यातूनच आत्मविश्‍वासाला बळ मिळते. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा ध्यास घेऊन त्यावर चिंतन आणि अध्ययन केल्यास व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर आत्मविश्‍वास वाढतो. याचा सकारात्मक परिणाम समोरील व्यक्तीवर, गटावर, समाजावर पडतो.

आत्मिक समाधान- स्व:शिक्षण केवळ बाह्यस्वरूपात समाधान देत नाही तर अंतरिक समाधान देखील देते. स्व शिक्षणाच्या बळावर मिळवलेल्या गोष्टीने आपण समाधानी वृत्तीने काम करत राहतो आणि विकासाकडे वाटचाल करतो.
अतिरिक्त पैसा मिळतो: ज्ञान ही एक शक्ती आहे आणि हिच शक्ती आपल्या उत्पन्नाची क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असते. स्व-शिक्षणातून मिळवलेले अतिरिक्त ज्ञान हा आपल्याला कल्पनेपेक्षा अधिक परतावा देण्यास उपयोगी ठरते. हुषार, प्रतिभावान, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मंडळींना बाजारात सतत मागणी असते. ही मंडळी आपल्यासारखीच असतात, केवळ सतत शिकण्याच्या वृत्तीने ते पुढे जात राहतात.

पात्रता वाढते –सातत्यपूर्ण ज्ञानवृद्धीमुळे आपल्यातील कौशल्य क्षमता, पात्रताही वाढते. लोकांना मदत करून आपली क्षमता वाढवता येते. तुम्ही जेवढ्या लोकांना मदत कराल, तेवढेच लोक तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीला धावून येतील. ही मदत करण्यासाठी क्षमता, कामाचा आवाका वाढणे गरजेचे आहे. ही क्षमता वाढणे किंवा स्वत:चा विश्‍वास वाढणे या गोष्टी स्व-शिक्षणातून प्राप्त होऊ शकतात.

– कॅ. नीलेश गायकवाड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)