महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लंक्ष करणाऱ्यांवर कारवाई करा

  • खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची लोकसभेत मागणी : खेड-सिन्नर रस्त्यावरील रखडलेली बाह्यवळणाची कामे सुरु करा

मंचर – खेड-सिन्नर रस्त्यावरील रखडलेली बाह्यवळणाची कामे सुरु करण्यात यावी. सरकारने या गंभीर बाबींमध्ये लक्ष द्यावे. संबंधित आयएल अँड एफएस आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना कोणत्याही विलंब न करता तात्काळ काम सुरु करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच संबंधित खासगी कंत्राटदार ज्यांनी महत्त्वाच्या नागरी प्रकल्पामध्ये दुर्लक्ष केले. त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून अशा महत्त्वाच्या प्रकल्पाची अमंलबजावणी वेळेत करण्याचे महत्त्व लक्षात येईल, अशी मागणी देखील यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान सभागृहाकडे केली.
यासंदर्भात लोकसभेत बोलताना खासदार आढळराव पाटील म्हणाले, माझ्या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 (जुना राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प) या रस्त्याचे काम ठेकेदार मे. आयएलएफ टान्स्पोर्टेशन नेटवर्क लिमिटेड आणि उप ठेकेदार यांच्यातील वादामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद पडले आहे. एक वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री, वाहतूक आणि राजमार्ग यांच्या उपस्थितीत पुण्यातील चांदणी चौक येथी पुलाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. याच कार्यक्रमात मंत्री महोदयांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 खेड-सिन्नर टप्प्यातील सहा बाह्यवळण रस्त्यांच्या कामांचेही भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री महोदयांनी जाहीर केल्यानुसार तीन महिन्यात काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या वर्षभरात एक रुपयाचेही काम सुरु झालेले नाही. असे खेद व्यक्‍त करीत खासदार आढळराव यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यापुढे आढळराव म्हणाले, या प्रकल्पामध्ये सहा बाह्यवळणांचा समावेश आहे. त्यापैकी राजगुरूनगर, खेड घाट, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बाह्यवळणाची कामे बऱ्याच मोठ्या कालावधीपासून कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित आहे. त्याला जोडणारे रस्ते बांधून तयार आहे. परंतु बाह्यवळणांची कामे अपूर्ण असल्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आहे तशीच आहे. या बाह्यवळणाच्या कामाला 12 फेब्रुवारी 2014 मध्ये सुरुवात आली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये 75 टक्‍के लांबीचा प्रकल्प पूर्ण झाल्याच्या निकषावर टोल वसुलीला सुरुवात झाली. मात्र, टोल वसुली सुरु होऊन देखील संबंधित आयातदाराकडून या बाह्यवळणांची कामे अद्याप पूर्ण केली नाहीत. आयएल अँड एफएस टान्स्पोर्टेशन नेटवर्क लिमिटेड या कंपनीकडून वेळोवेळी जागेचे भूसंपादन झाले नसल्याचे तसेच शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध असल्याची खोटी कारणे देऊन दिशाभूल केली जात आहे. सद्यस्थिती पाहता बाह्यवळण रस्त्यांची कामे सुरु करण्यासाठी आवश्‍यक भूसंपादन होऊन जागाही ताब्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, भूसंपादनाचे पैसे मिळाले नसतानाही एकही शेतकऱ्याने रस्त्याच्या कामाला विरोध केलेला नाही. हा संपूर्ण परिसर वाहतूककोंडी आणि प्रदुषणामुळे हैराण झाला असल्याने या अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर होणे अतिशय गरजेचे झाले आहे. खेड ते आळेफाटा या 70 किलोमीटर अंतरासाठी पाच ते सहा तास प्रवास करावा लागतो. तर, अनेकदा गंभीर उपचारांसाठी रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही बराच वेळ वाहतुकीमध्ये अडकून पडावे लागते. जेव्हा या विभागाचे मंत्री स्वतः सार्वजनिकरित्या लोकांकडे ही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची खात्री देतात, तेव्हा संबंधित विभागाने आणि अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने स्वतः जातीने लक्ष घालून ही कामे जबाबदारीने पूर्ण करणे आवश्‍यक असते. मात्र, यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प प्रशासकीय उदासिनतेमुळे रखडतात. तेव्हा या भागाचा स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधिल राहावे लागते. केवळ घोषणा करून आवश्‍यक पायाभूत सुविधा निर्माण होणार नाही. या प्रकल्पामध्ये संबंधित खात्याने स्वतः लक्ष घालून आयएल अँड एफएस या दोषी कंत्राटदारावर आणि कामचुकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. जेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. तेव्हा सरकारच्या विश्वासर्हतेला तडा जातो. आपल्या व्यवस्थेतेतील अशा कमतरतांमुळे या विभागातील लोकप्रतिनिधींना विनाकारण नागरिकांचा रोष सहन करावा लागतो. या कामाचे खासगी कत्रांटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान सभागृहाकडे केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)