महत्त्वपूर्ण निर्णय : फटाक्‍यांच्या आतषबाजीला वेळमर्यादेची चौकट (भाग-१)

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी, ख्रिसमस आणि नववर्षागमनाच्या प्रसंगी होणाऱ्या फटाक्‍यांच्या आतषबाजीला नियमांची आणि वेळमर्यादेची चौकट घालून दिली आहे. त्यानुसार दिवाळीच्या काळात रात्रीच्या वेळी केवळ दोन तास फटाके उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. प्रदूषण रोखण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी इतक्‍या चांगल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने हाताळली त्याबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले पाहिजे. आत्तापर्यंत सरकार फटाकेबंदीच्या दिशेने बाल पावले किंवा बेबी स्टेप्स टाकत होते. त्या दृष्टीने विचार करता न्यायालयाने ही खूप मोठी पायरी चढली आहे.

यासंदर्भातील याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आली होती. त्यातही हा मुद्दा होता पण सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा वर्ग असल्याने न्यायालय निर्णय घेईल असे म्हटले. निकाल देताना न्यायालयाने एक महत्त्वाचा विचार मांडला आहे आणि तो समजून घेणे आवश्‍यक आहे. त्यानुसार राज्य सरकार सामूहिक फटाके फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करू शकते का याचा विचार करण्यात यावा असे म्हटले आहे. त्यासाठी स्थळ निश्‍चिती करावी आणि नागरिकांना एकाच ठिकाणी फटाके फोडण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यामधून दरवर्षी फटाक्‍यांमुळे लागणाऱ्या आगी मोठ्या प्रमाणावरील संपत्तीची हानी आणि जीवितहानी टळू शकते, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही जणांनी तक्रारीचा सूर लावला आहे. केवळ हिंदू सणांनाच का निर्बंध आहेत, असा सवाल केला जात आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडवल्या जाणाऱ्या सर्वच सणांसाठी हे निर्बंध टाकले आहेत. ख्रिसमससाठी देखील रात्री 11.45 ते 12.45 अशी कालमर्यादा दिली आहे. त्यामुळे या निकालाला उगाचच धार्मिक रंग देऊन लोकांची दिशाभूल केली जाऊ नये. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, फटाके फोडण्याचा आणि सण उत्साहात साजरे करण्याचा काहीही संबंध नाही. कोणत्याच धर्मग्रंथात दिवाळीत फटाके फोडावेत असे लिहिलेले नाही. दिवाळी साजरी करण्याची धार्मिक प्रक्रिया म्हणूनही फटाक्‍यांचा कुठेही उल्लेख झालेला नाही. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर इतक्‍या चांगल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने हाताळली त्याबद्दल आपण सर्वांनीच समाधान व्यक्त केले पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज पर्टीक्‍युलेट मॅटर 2.5 झाला आहे. वातावरणातील प्रदूषणाच्या थराची जाडी वाढली आहे. त्यामुळे वायूप्रदूषण टीपेला पोहोचले आहे. त्याचे परिणाम आरोग्यासह हवामानावरही होत असलेले आपण पाहात आहोत. मुळात ऑक्‍सिजन म्हणजे प्राणवायू आपण तयार करू शकत नाही, पण जगण्यासाठी तो सर्वांनाच हवा आहे. अशा वेळी वातावरणातील प्रदूषणकारी पदार्थ वाढवण्याचा आपल्या कोणालाच अधिकार नाही. झाडे प्राणवायू तयार करतात आणि वातावरण चांगले ठेवतात. तेच वातावरण आपण एका झटक्‍यात खराब करण्याचा आपल्याला अधिकारच नाहीये. चांगल्या प्रकारे पौराणिक, शास्त्रशुद्ध पद्धतीने, शांततामय मार्गाने दिवाळी साजरी करण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. हा मार्ग अनुसरत भेटीगाठी करून, आपापसांत बसून फराळ करत, संवाद साधत, नातेवाईकांकडे जमून, सर्व लोक एकत्र येऊन दिवाळी तितक्‍याच उत्साहाने आणि आनंदाने साजरी करू, असा विचार आपण केला पाहिजे.

आता प्रश्‍न उरतो तो समाज म्हणून, सुजाण नागरिक म्हणून नागरिक हा निर्णय अंमलात आणतील का हा. आपल्याकडे दिवाळीच्या पहाटे फटाके वाजवण्याची पद्धत वर्षानुवर्षांपासून आहे. भारतीय समाज हा जैसे थे अशी परिस्थिती मान्य कऱणारा समाज आहे. त्यामुळे लवकर कोणतेही बदल हा समाज स्वीकारणार नाही. गेल्या 25 वर्षांपासून फटाके विरोधी अभियानांतर्गत आम्ही काम करतो आहे. आम्ही हाताने लिहिलेले बॅनर लावायचो; पण ते लोक फाडून टाकत असत. आम्हाला फटाके विक्रेत्यांच्या धमक्‍याही यायच्या. यासंदर्भात मी स्वतः पर्यावरण याचिका दाखल केल्या. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणामध्ये आम्ही संपूर्ण फटाके बंदीची मागणी केली होती. त्यामुळे आपण प्रबोधन होऊच शकत नाही इतक्‍या नैराश्‍याच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो, अशी परिस्थिती आहे.

महत्त्वपूर्ण निर्णय : फटाक्‍यांच्या आतषबाजीला वेळमर्यादेची चौकट (भाग-२)

दुसरीकडे, सरकारी पातळीवरही प्रबोधन कधीच प्रभावी पद्धतीने होताना दिसले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, राज्य पर्यावरण विभाग, पर्यावरण आणि वन मंत्रालय हे जाहिराती काढतात; पण त्या प्रभावी नसतात. पण एक विचार म्हणून फटाके बंदीचा मुद्दा मांडला जात नाही. बरेचदा लोकभावनेच्या विरोधात कसे जायचे अशीही भूमिका सरकारी पातळीवर दिसते; पण लोकभावना या दरवेळी योग्य असतातच असे नाही. म्हणूनच गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी यांनी या सर्व पारंपरिक समाजांवर प्रहार केले आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांनीही प्रहार केले. शाहू महाराजांनीही हीच परंपरा पुढे नेत अनिष्ट परंपरा नकोत असे म्हणत त्या तोडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांची नावे उठता-बसता राज्यकर्ते घेत असतात; पण त्यांची प्रबोधनाची चळवळ राबवताना मात्र हात आखडता घेतला जातो. अर्धवट आणि मनापासून प्रबोधन केले जात नसल्याने त्याचा प्रभाव पडत नाही. दुसरीकडे वैयक्तिक पातळीवर जे लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतात त्यांना धमक्‍या देणे, त्रास देणे हे प्रकार घडतात.

– अॅड. असीम सरोदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)