महत्त्वपूर्ण निर्णय : फटाक्‍यांच्या आतषबाजीला वेळमर्यादेची चौकट (भाग-२)

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी, ख्रिसमस आणि नववर्षागमनाच्या प्रसंगी होणाऱ्या फटाक्‍यांच्या आतषबाजीला नियमांची आणि वेळमर्यादेची चौकट घालून दिली आहे. त्यानुसार दिवाळीच्या काळात रात्रीच्या वेळी केवळ दोन तास फटाके उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. प्रदूषण रोखण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी इतक्‍या चांगल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने हाताळली त्याबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले पाहिजे. आत्तापर्यंत सरकार फटाकेबंदीच्या दिशेने बाल पावले किंवा बेबी स्टेप्स टाकत होते. त्या दृष्टीने विचार करता न्यायालयाने ही खूप मोठी पायरी चढली आहे.

महत्त्वपूर्ण निर्णय : फटाक्‍यांच्या आतषबाजीला वेळमर्यादेची चौकट (भाग-१)

फटाके निर्मिती हा खूप मोठा उद्योग आहे. त्यांची मोठी शक्तिशाली लॉबी आहे. तमिळनाडूमध्ये सहा हजार कोटी फटाक्‍यांची निर्मिती होते. या उद्योगात 20 हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. फटाकेविक्रीची मोठी साखळी आहे. या व्यवसायात 100 टक्के नफा आहे. त्यामुळे तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने घेऊन जगणारे लोक आहेत. आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य असले तरी पर्यावरण, निसर्ग, वातावरण खराब करणारा कोणताही उद्योग नसला पाहिजे. आज परदेशातील लोक येऊन आपल्या इथे दिवाळीच्या सोहळ्याचा आनंद घेतात; पण त्यांच्याकडून एक मार्मिक प्रश्‍न उपस्थित केला जातो. या देशात इतकी गरीबी आहे, भूकबळी जातात, तरीही एवढ्या मेहनतीने मिळवलेल्या पैशाचा धूर करण्यात या लोकांना आनंद कसा मिळतो, असा प्रश्‍न त्यांना पडतो. आपलेच पैसे धुरात उडवताना आपण खुश कसे होतो असा प्रश्‍न ते विचारतात. पण अशा प्रश्‍नांचा विचारच समाजाला करायचा नाहीये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी फटाके उद्योगात आगी लागतात. यामध्ये कामगार होरपळून मरतात. तिथे महिला, लहान मुले यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होते. फटाके वळण्याच्या कामासाठी लहान मुलांची गरज असते. तिथे काम करणारी मुले बेकायदेशीरपणे काम करतात. त्यातूनच महिला आणि मुलांचे जीव धोक्‍यात येतात. सतत फटाक्‍यात दारू भरण्याचे काम करून त्यांना श्‍वसनाचे रोग, त्वचारोग होतात. फटाके उडवण्यात आनंद मानताना आपण याचा काहीच विचार करत नाही. ही संवेदनशीलता गमावून बसल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

सर्वोच्च न्यायालयाने आवाजाचे निकष पाळणाऱ्या फटाक्‍यांच्या विक्रीस परवानगी दिली आहे. त्यात पेट्रोलियम पदार्थ सुरक्षा संस्था यांच्यावर निकष निश्‍चितीची जबाबदारी टाकली आहे. पण ही संस्था कार्यरतच नाही. अन्यथा, दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिनी फटाके पकडले गेलेच नसते. आज काही हजार कोटींच्या चिनी फटाक्‍यांची विक्री आपल्या देशात होते आणि याचे आपल्याला काहीच वाटत नाही ही खेदाची बाब आहे. हे फटाके विनापरवाना देशात येतात. अशा वेळी आपण कोणत्या देशप्रेमाच्या गोष्टी करतो? विनापरवाना येणाऱ्या फटाक्‍यांची संख्या जर इतकी प्रचंड असेल तर इथे दारुगोळाही सहजगत्या येऊ शकतो याचा विचार आपण करणार आहोत की नाही? त्यामुळे नागरिकांनी देशप्रेम दाखवण्याची खरी गरज आणि वेळ आत्ता आली आहे. दिवाळीच्या वेळी फटाक्‍यांवर नागरिकांनी स्वतःच निर्णय घेऊन बंदी आणली पाहिजे आणि देशावर प्रेम आहे हे दाखवून दिले पाहिजे. फटाके उद्योगात होणाऱ्या शोषणाची जाणीवही याप्रसंगी ठेवली पाहिजे.

– अॅड. असीम सरोदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)