चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती (जश्न-ए-मिलादुन्नबी) निमित्त शांतता, राष्ट्रीय एकात्मतेची भव्य मिरवणूक पारंपरीक वेषभूषेत काढून उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात लहान मुला-मुलींचा लक्षणीय सहभाग होता.
पिंपरीतील मिलिंदनगर येथील जामा मस्जीद जमात-ए-लतिफिया येथे आज दुपारी दीड वाजता जोहरची नमाज पठण केल्यानंतर मुस्लीम धर्मगुरु सय्यद मेहबूबमियॉं कादरी, शहेजादा-ए-गौस-ए-आझम (अहमदनगर), पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी नियाज अहमद सिद्दीकी, उपाध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी, सचिव हाजी अकबर मुल्ला, सह सचिव हाजी गुलाम रसूल सय्यद, खजिनदार हाजी इद्रीस मेमन (खालू), सह खजिनदार मुश्ताक अहमद शेख, माजी अध्यक्ष हाजी भाईजान काझी, सल्लागार हबीबभाई शेख, झिशान सय्यद, अझहर खान, रमजान अत्तार, मशिदींचे मौलाना मुस्लीम बांधवाच्या उपस्थितीत शांतता मिरवणुकीला प्रारंभ झाला व पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता झाली.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध मशिदी, मदरसे तेथील धर्मगुरु, मुस्लीम बांधव, पताका, झेंडे, हातात घेऊन एकात्मतेचा संदेश देत मिरवणुका विविध ठिकाणांहून विविध मार्गे पिंपरी येथे आल्या. दुचाकी, चार चाकी वाहने, मक्का मदिना, फुलांच्या प्रतिकृतीचा विलोभनीय समावेश होता. देहुरोड भागातून निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, वाकड, काळाखडक, थेरगांव, काळेवाडी, पिंपरी, कॅम्पात मिरवणुका काढण्यात आल्या.
दापोडी, फुगेवाडी, पिंपळे-गुरव, कासारवाडी, दिघी, चोवीसावाडी, भोसरी, लांडेवाडी, बालाजीनगर, नेहरुनगर, अजमेरा येथे मिरवणुका काढण्यात आल्या. चिखली, कुदळवाडी, घरकुल, शाहुनगर ते मोरवाडी मार्गे, पिंपरीपर्यंत मिरवणुका काढल्या. जागोजागी पिण्याचे पाणी, शरबत, फळ, मिठाईचे वाटप करण्यात आले. सर्व मिरवणुकांची पिंपरी येथे सांगता करण्यात आली. त्यानंतर पिंपरी येथे हजरत हाश्मी मियॉं आशरफ कछोछा शरिफ यांचे प्रवचन झाले. पिंपरी चिंचवड शहरातील मशीद व मदरशांचे सुमारे 130 हून अधिक धर्मगुरु, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रातील सर्व धर्मिय मान्यवर उपस्थित होते.
जुलूस कमिटीचे उपाध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी यांनी प्रस्तावना केली. सचिव हाजी अकबर मुल्ला यांनी सूत्रसंचालन व अध्यक्ष हाजी नियाज अहमद सिद्दीकी यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा