मसूर – कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. शालन माळी यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याने वाहन चालविताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत. सौ. माळीदेखील याच रस्त्याने नेहमी प्रवास करत असतात. मग त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का? त्यांच्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न का होत नाहीत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून होऊ लागला असून “सभापतींच्या गावाला जाताय? जरा जपून’ अशा प्रकारची थट्टाच आता नागरिकांमधून होत आहे.
मसूर-किवळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून या रस्त्यासाठी अनेक वेळा विविध संघटनांनी व ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. शालन माळी यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याने “सभापतींच्या गावाला जाताय ! पण जरा जपून’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मसूर ते किवळ रस्त्यावर प्रवाशांची नेहमीच गदीं असते. मात्र, गेल्या दोन वर्षां वर्षापासून या रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे दीड किलोमीटर असणारा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरुन प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिखली, निगडी, किवळला जाण्यासाठी असणारा हा मुख्य रस्ता खड्डेमय बनल्यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. हा रस्ता करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. तर काही ग्रामस्थांनी स्वखर्चाने या रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे भरले होते. यावेळी बांधकाम विभागाने एका महिन्यात रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असतानाही याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका अद्यापही सुरु असल्यामुळे अनेकांना आपले अवयव गमवावे लागत आहेत. कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. शालन माळी यांच्या किवळ गावाकडे जाण्यासाठी ही हाच एकमेव रस्ता असल्याने त्यांनाही रोज याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे परिसरातील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा